ठाणे रेल्वे स्टेशनच्या विकासासाठी ८०० कोटी रुपयांची निविदा

ठाणे : ऐतिहासिक ठाणे रेल्वे स्थानकाचा विकास करण्यासाठी भाजपाकडून करण्यात आलेल्या प्रयत्नांना यश आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली रेल्वे मंत्रालयाने ठाणे रेल्वे स्टेशनच्या पुनर्विकासासाठी ८०० कोटी रुपयांची निविदा जारी केली आहे.
येत्या ३१ मार्च रोजी निविदा खुली होत आहे. या महत्वपूर्ण व ऐतिहासिक निर्णयाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव, रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे भाजपाचे आमदार व ठाणे शहराध्यक्ष निरंजन डावखरे व आमदार संजय केळकर यांनी आभार मानले आहेत.
ठाणे रेल्वे स्टेशनच्या विकासासाठी ठाणे शहर भाजपच्या वतीने रेल्वेमंत्री अश्विनीजी वैष्णव यांची गेल्या वर्षी ८ डिसेंबर २०२१ रोजी भेट घेतली होती. राज्यसभेचे तत्कालीन सदस्य विनय सहस्त्रबुद्धे यांच्या नेतृत्वाखाली या शिष्टमंडळात आमदार निरंजन डावखरे, महापालिकेतील तत्कालीन गटनेते मनोहर डुंबरे, सुजय पत्की यांचीही उपस्थिती होती.
मुंबई-ठाणे दरम्यान १६ एप्रिल १८५३ मध्ये पहिल्यांदा रेल्वे गाडी धावली होती त्यामुळे ठाणे स्थानकालाही ऐतिहासिक दर्जा आहे या रेल्वे स्टेशनच्या विमानतळाच्या धर्तीवर विकासामुळे प्रवाशांचा प्रवास सुकर होईल.
ठाणे स्थानकाच्या पुनर्विकासासाठी ३१ मार्च २०२३ पर्यंत निविदा प्रक्रिया खुली होत असून ३१ मेपर्यंत संपूर्ण प्रक्रिया पूर्ण केली जाईल. त्यानंतर लगेचच कामाला सुरुवात होणार आहे. त्यामुळे काही महिन्यातच ठाणेकरांना अद्ययावत स्थानक उपलब्ध होईल.

रेल्वेस्थानकाबाहेरील रिक्षांचे परिचलन शिस्तबद्ध होणार

ठाणे: ठाणे रेल्वे स्टेशनबाहेर पश्चिमेकडे बेकायदेशीर आणि बेशिस्त रिक्षा व त्यातून प्रवाशांची होणारी गैरसोय या विरोधात आता ठाणे महापालिका आणि पोलीस संयुक्तपणे धडक कारवाई मोहीम हाती घेण्यात येणार असल्याची माहिती महापालिका प्रशासन, ठाणे पोलीस व वाहतूक पोलीस यांच्यामध्ये शुक्रवारी झालेल्या बैठकीत आयुक्त अभिजीत बांगर यांनी दिली. या समस्येबाबत आमदार संजय केळकर यांनी दोन दिवसांपूर्वीच आयुक्तांची भेट घेऊन काही सूचना केल्या होत्या.
ठाणे पश्चिम रेल्वे स्टेशन बाहेरच्या परिसरात रिक्षा चालकांच्या बेशिस्त वर्तनामुळे प्रवाशांना होणारा त्रास, अनधिकृत फेरिवाले, वाहतूक कोंडी याबाबत अनेक तक्रारी महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडे आल्या होत्या. त्यानंतर तातडीने स्टेशन परिसरात दौरा करुन ठाणे रेल्वेस्थानकाबाहेर 150 मीटर परिसरातील फेरीवाल्यांवर कारवाई करण्यात आली. दररोज पाच लाखाहून अधिक प्रवासी ठाणे रेल्वेस्थानकातून प्रवास करतात.  महिला व मुली यांच्यासाठी रेल्वेस्थानक परिसरात सुरक्षिततेचे वातावरण असावे या दृष्टीने उपाययोजना करण्याचे नियोजन आहे. रेल्वे परिसरात होणाऱ्या  वाहतूकीची कोंडीतून प्रवाशांना दिलासा मिळावा यासाठी रिक्षांचे परिचालन यामध्ये शिस्त असावी याबाबत सदर बैठकीत नियोजन करण्याच्या दृष्टीकोनातून चर्चा करण्यात आली.
बैठकीस वाहूतक पोलीस उपायुक्त विनयकुमार राठोड, परिमंडळ 1 चे पोलीस उपायुक्त गणेश गावडे, महापालिकेचे उपायुक्त शंकर पाटोळे आदी उपस्थित होते.
रेल्वे स्टेशनमधून बाहेर पडणाऱ्या प्रवाशांना हाताला धरून रिक्षामध्ये ओढत नेणे, अपेक्षित भाडे मिळेपर्यत आडमुठी भूमिका घेऊन रिक्षा रस्त्यात लावून ठेवणे, भाडे नाकारणे, बेशिस्तपणे रिक्षा पार्किंग करणे, अनधिकृत रिक्षांचा वावर, महिला प्रवाशांना त्रास देणे, महिला रिक्षा चालकांना अन्य रिक्षा चालकांकडून होणारा त्रास, रेल्वेच्या हद्दीत उभे राहून प्रवाशांचा भाड्यासाठी पाठलाग करणे आदी स्वरूपातील तक्रारीं नागरिकांच्या असून त्यावर करावयाची उपायोजना याबाबत या बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली.
गेल्या वर्षभरात 500 हून अधिक बेशिस्त रिक्षा चालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. मात्र त्यानंतर ही परिस्थिती बदललेली नसल्याचे पोलीसांनी नमूद केले.  त्यामुळे यापुढे ठाणे रेल्वे स्टेशन परिसरात पोलिसांची नियुक्ती विशेष स्वरूपात करण्यात येईल त्यातून भाडे नाकारणारा रिक्षा चालक बेशिस्तपणे पार्किंग करणारा रिक्षाचालक व अनधिकृत रिक्षा चालक यांच्यावर कारवाई  ज्या रिक्षा परवाना विना बेकायदेशीर चालवल्या जात आहेत त्या जप्त केल्या जातील, या कामात ठाणे महापालिकाही पोलिसांना सहकार्य करेल, असे पालिका आयुक्तांनी सांगितले.
या परिसरात वातानुकूलित टँक्सी स्टँड असून तो त्याच ठिकाणी दुसऱ्या लेनमध्ये सुरू केला तर खासगी वाहनांना जाण्यासाठी जी मार्गिका आहे ती खुली होईल, तसेच या परिसरात अधिकच्या दिव्यांची गरज असल्याचे पोलिसांनी सांगितले. वातानुकूलित टॅक्सी स्टॅण्डबाबत प्रत्यक्ष पाहणी करुन संबंधित संघटनांशी चर्चा करुन निर्णय घेण्यात येईल असे आयुक्त श्री. बांगर यांनी स्पष्ट केले.