इस्लामाबाद: पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वा प्रांतातील नौशेराचा समावेश देशातील मागास भागात व्हायचा. पण आता या भागात सोन्याच्या शोधासाठी स्पर्धा सुरु झाली आहे. कुंडपासून निजामपूरपर्यंत नौशेरा जिल्ह्यात सोन्यासाठी खोदकाम सुरु आहे.
नौशेराला पंजाबच्या अटकेपर्यंत जोडणाऱ्या ब्रिटिशकालीन रेल्वे पुलापर्यंत नदीच्या किनाऱ्यावर खोदकाम सुरु आहे. भारतातून पाकिस्तानात वाहणाऱ्या सिंधू नदीत सोन्याचा शोध सुरु आहे. सोन्याच्या लोभापायी हा निर्जन भाग आता मारामारीचं केंद्र झाला आहे.
पाकिस्तानी वृत्तपत्र डॉनच्या वृत्तानुसार, संपूर्ण दिवस खोदकाम करणारे लोक नदीपात्रात शिरुन सोन्याचा शोध घेत आहेत. मजूर माती आणि दगडांनी भरलेल्या बादल्या काढतात आणि स्लुईस मॅटचा वापर करुन त्या रेतीमधून सोन्याचे शोध घेऊन बाजूला काढण्याचा प्रयत्न करतात. या खोदकामामुळे निजामपूर पोलीस स्टेशनमधील पोस्टिंग आता आकर्षक झाली आहे. इथे काम करण्यासाठी मजुरांना दिवसाचे १००० ते १५०० रुपये मिळतात.
या भागात सिंधू नदीच्या पाण्यात काबूलहून येणारा चिखल मिसळतो. सिंधू आणि काबूल नद्यांमधील सोन्यामुळे या प्रदेशाची आर्थिक स्थिती बदलली आहे. आधी या भागात कमी प्रमाणात खोदकाम व्हायचं. पण गेल्या काही महिन्यांत नदीतील खोदकामाला ऑपरेशनचं स्वरुप आलं आहे. मजूर दिवस-रात्र खोदकाम करत असतात. नदीच्या तळातून बादल्या काढण्याचं काम अविरत सुरु असतं.
सिंधू नदीत सोन्याचा मोठा साठा असल्याची माहिती या वर्षाच्या सुरुवातीस समोर आली. अटकजवळ ८०० अब्ज रुपयांचं सोन्याचं भंडार असल्याचा अहवाल प्रसिद्ध झाला. पंजाबचे माजी खाण आणि खनिज मंत्री इब्राहिम हसन मुराद यांनी हा दावा केला. पाकिस्तानच्या भूवैज्ञानिक सर्वेक्षण अहवालाच्या आधारे त्यांनी हा दावा केला.
प्लेसर गोल्ड मायनिंगला वेग आल्यानं पर्यावरणतज्ज्ञांनी चिंता व्यक्त केली. नदीच्या तळाशी सुरु असलेल्या खोदकामामुळे जलजीवनावर प्रतिकूल परिणाम होण्याची भीती आहे. सोनं काढण्यासाठी सुरु असलेल्या पाऱ्याचा वापर धोकादायक ठरु शकतो. नदीत मोठ्या प्रमाणात खाणकाम सुरु झाल्यानं मच्छिमारांना पुरेसे मासे मिळत नाहीत. त्याचा परिणाम त्यांच्या मिळकतीवर झाला आहे.