राम गणेश गडकरी रंगायतनच्या नुतनीकरणासाठी आठ कोटी

नाट्यकर्मी-प्रेक्षकांच्या सुविधांना प्राधान्य द्या-प्रशांत दामले

ठाणे : वारंवार दुरुस्तीनंतरही सुविधांबाबत बोंब असलेल्या गडकरी रंगायतनच्या नूतनीकरणाचे काम हाती घेण्यात आले असून राज्य शासनाने त्यासाठी आठ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. नूतनीकरण करताना नाट्यकर्मी आणि नाट्य रसिकांच्या सुविधांना प्राधान्य देण्याची मागणी ज्येष्ठ अभिनेते प्रशांत दामले यांनी केली आहे.

गडकरी रंगायतनमध्ये रंगकर्मींना तसेच प्रेक्षकांना जाणवणाऱ्या गैरसोयींबद्दल तक्रारी आणि सूचना मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्याकडे व्यक्त करण्यात आल्या होत्या. त्यासंदर्भात, मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या निर्देशानुसार, महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी प्रत्यक्ष पाहणी केली. तसेच रंगायतनच्या वास्तूचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात आले. त्यात, मूळ वास्तू सुस्थितीत असून अंतर्गत रचना आणि सुविधा यात आमूलाग्र बदल करण्याची गरज असल्याचे स्पष्ट झाले. त्याप्रमाणे, गडकरी रंगायतनच्या नूतनीकरणाचा प्रस्ताव ठाणे महापालिकेने राज्य सरकारकडे दिला होता. त्यास मंजुरी मिळाली असून त्यासाठी आठ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.

सन १९७८मध्ये बांधण्यात आलेल्या रंगायतनची २००५ मध्ये मोठ्या प्रमाणावर दुरुस्ती करण्यात आली होती. त्यानंतर आता १८ वर्षांनी मोठ्या प्रमाणात नुतनीकरण होत आहे. रंगायतनची आसनक्षमता १०८० एवढी आहे. गडकरी रंगायतनचे नूतनीकरण करताना प्रामुख्याने, मुख्य वास्तूचे मजबुतीकरण, तालीम हॉलचे नुतनीकरण, मुख्य प्रेक्षागृहातील संपूर्ण आसनव्यवस्था बदलणे, रंगकर्मी यांच्यासाठी असलेल्या ग्रीन रूममध्ये आवश्यक सुधारणा, रंगमंच-फ्लोरिंग अद्ययावत करणे, वातानुकूलन यंत्रणेत सुधारणा, शौचालयांचे संपूर्ण अद्यावतीकरण आदी कामांचा समावेश आहे.

रंगायतनमधील कार्यक्रम सुरू ठेवून करता येणारे दुरुस्ती काम आणि रंगायतन बंद ठेवून करायचे दुरुस्ती काम याचे नियोजन करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले आहेत. त्यानुसार दुरुस्तीचे काम लवकरच हाती घेतले जाणार आहे, असल्याची माहिती उपायुक्त उमेश बिरारी यांनी दिली.

नुतनीकरणाचा आराखडा तयार करण्याचे काम सध्या सुरू असून त्या दृष्टीने नाट्यकर्मींच्या सूचना जाणून घेण्याचे निर्देश महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी दिले आहेत. त्यानुसार, अखिल भारतीय नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले, नगर अभियंता प्रशांत सोनाग्रा, उपायुक्त (माहिती व जनसंपर्क) उमेश बिरारी, उपनगर अभियंता विकास ढोले, उपनगर अभियंता शुभांगी केसवानी, कार्यकारी अभियंता प्रशांत पाठक यांची बैठक गडकरी रंगायतन नुकतीच झाली. त्यात रंगायतनमधील तांत्रिक आणि अतांत्रिक सुधारणांची चर्चा करण्यात आली.

ठाणे महानगरपालिकेच्या राम गणेश गडकरी रंगायतन या नाट्यगृहाचे नुतनीकरण नाट्यकर्मी आणि रसिक प्रेक्षक यांच्यासाठी सुविधा देणारे असावे. तसेच ते नेटकेपणाने केले जावे, अशी अपेक्षा ज्येष्ठ अभिनेते, निर्माते आणि अखिल भारतीय नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले यांनी व्यक्त केली आहे.

या बैठकीत, गडकरी रंगायतनच्या नुतनीकरणात आसनव्यवस्था बदलताना सध्या असलेली खुर्च्यांची संख्या कमी केली जाऊ नये, प्रेक्षकांसाठी लिफ्टची सोय केली जावी आणि स्वच्छतागृहे नियमितपणे स्वच्छ राहतील, याची काळजी घेतली जावी, अशा काही सूचना दामले यांनी केल्या. तसेच, रंगायतनची ध्वनीक्षेपण यंत्रणा चांगली आहे, मात्र बाल्कनीतील प्रेक्षकांना अधिक सुस्पष्ट ऐकू येण्यासाठी तिथे जास्तीचे स्पीकर बसवण्यात यावेत, असेही दामले यांनी सांगितले. रंगमंच, ग्रीन रूम आदींबाबत त्यांनी त्यांची निरीक्षणे नोंदवली.