सिव्हिल रुग्णालयात फिजिओथेरपी घेणाऱ्या रुग्णांचे प्रमाण ४९ टक्के!

* मोबाईल-संगणकावर तासनतास काम
* मानदुखी-पाठदुखीने युवा त्रस्त

ठाणे: शारीरिक परिश्रम कमी अणि तासन्तास खुर्चीला खिळून बसणे, मोबाईल व संगणक, टीव्हीसमोर बसणे तसेच शिवणकाम अशा काही कारणांमुळे तरुण वर्गात मानदुखी आणि पाठदुखीची समस्या डोकेवर काढत आहे. ठाणे सिव्हिल रुग्णालयातील भौतिकोपचार आणि व्यवसायोपचार विभागात ४० टक्के रुग्ण हे या प्रकारात मोडतात.

अवेळी जेवण, अपुरी झोप त्यात व्यायामाचा अभाव, मोबाईल आणि संगणकाच्या वापराने शरीरावर विपरीत परिणाम होतात. पूर्वी पन्नाशी-साठीनंतर होणा-या व्याधी आजच्या युवा वर्गात दिसून येतात. सिव्हिल रुग्णालयात फिजिओथेरपी घेण्यासाठी विशीतल्या रुग्णांची संख्या वाढते आहे. चक्कर येणे, हाताला मुंग्या, हाता-बोटांची पकड कमी अशी लक्षणे त्यांच्यात दिसून येत आहेत.

ठाणे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. कैलास पवार, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. धीरज महांगडे, अस्थी तज्ज्ञ डॉ. विलास साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली भौतिकोपचार व व्यवसायोपचार विभागात रुग्णांवर उपचार करण्यात येत आहेत.

या रुग्णांमध्ये ४० टक्के रुग्ण मानदुखीचे १६ ते ३० वयोगटातील आहेत, अशी माहिती भौतिकोपचार तज्ज्ञ डॉ. ज्ञानेश्वर सलगर यांनी दिली.

मानदुखींची कारणे चुकीची बैठक व सतत मान एकाच स्थितीत ठेवून मोबाईल, टीव्ही, लॅपटॉप, संगणक, शिवणकाम, सतत बसून टेबल काम, डोक्यावर जड ओझे वाहण्याची कामे, झोपताना मानेखाली अयोग्य उशीचा वापर, याशिवाय मुलींमध्ये तारुण्यात येताना संप्रेरकामुळे होणारे शारीरिक बदल, वयोमानानुसार होणारी मानेच्या व मणक्यांची झिज,अपघातामुळे मानेला होणारी इजा यामुळे मानदुखीचा त्रास उद्भवू शकतो, अशी माहिती व्यावसायोपचार तज्ञ्ज्ञ डॉ. नम्रता पाटणे, डॉ. सुप्रिया कांबळे यांनी दिली.

मानदुखी टाळण्यासाठी उपाययोजना
मानेच्या तीव्र वेदना कमी करण्यासाठी विविध प्रकारच्या विद्युत, चुंबकीय व ध्वनीलहरी अतिशय उपयुक्त आहेत. मानदुखीचा त्रास होऊ नये म्हणून योग्य शारीरिक स्थिती ( करेक्ट पोश्चर) व योग्य उशीचा वापर, कॅल्शियम,जीवनसत्त्व व बी_ १२युक्त आहार, नियमित व सातत्याने मानेचे केलेच पाहिजेत शिवाय व्यायाम अशी माहिती डॉ. कैलास पवार (ठाणे जिल्हा शल्य चिकित्सक) यांनी दिली.