उद्धव ठाकरे यांना आणखी एक धक्का
कल्याण : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना कल्याणमध्ये मोठा धक्का दिला आहे. कल्याण डोंबिवली महापालिकेतील 40 माजी नगरसेवकांसह काही पदाधिकारी शिंदे गटात सामील झाले आहेत. काल रात्री शिंदे यांच्या नंदनवन या शासकीय निवासस्थानी त्यांची बैठक पार पडली.
राज्याच्या राजकारणात दररोज काही ना काही घडमोडी सुरु आहेत. शिवसेनेत दोन गट पडले आहेत. दोन्ही गटांकडून शिवसेना आमचीच असा दावा केला जात आहे. ठाणे आणि नवी मुंबईतील नगरसेवक हे शिंदे गटात सामील झाले होते. काल रात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत कल्याण-डोंबिवली महापालिकेतील 40 माजी नगरसेवक आणि पदाधिकारी शिंदे गटात सामील झाले आहेत.
कल्याण डोंबिवलीसाठी ही अत्यंत महत्वाची राजकीय घडामोड आहे. काही महिन्यात महापालिकेची निवडणूक पार पडणार आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्यासोबत किती नगरसेवक आणि पदाधिकारी राहतात. याकडे लक्ष लागले आहे. शिंदे यांच्याकडून ठाकरे यांना धक्का देणे सुरुच आहे.