३८९१ अनधिकृत फलक हटवले; ७६ प्रकरणात गुन्हे दाखल

ठाणे महापालिकेची डिसेंबर महिन्यात कारवाई

ठाणे: डिसेंबर-२०२४मध्ये ठाणे महापालिका क्षेत्रातील सर्व प्रभागांमधून ३८९१ अनधिकृत फलक, पोस्टर्स, बॅनर्स हटवण्यात आले. तर, ७६ प्रकरणात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. अनधिकृत फलक हटवण्याची मोहीम सातत्याने सुरू ठेवण्याचे निर्देश महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिले आहेत.

ठाणे महापालिकेचा अतिक्रमण विभाग आणि प्रभाग समिती यांच्या मार्फत डिेसेंबर महिन्यात ३८९१ अनधिकृत फलक, पोस्टर्स, बॅनर्स हटवण्यात आले. ही कारवाई सहाय्यक आयुक्तांमार्फत सातत्याने सुरू आहे. एकूण ७६ प्रकरणात गुन्हेही दाखल करण्यात आल्याची माहिती उपायुक्त (अतिक्रमण) शंकर पाटोळे यांनी दिली.

महापालिका क्षेत्राचे विद्रुपीकरण थांबवण्यासाठी दैनंदिन मोहीम राबवून अनधिकृत फलक हटवण्याची आवश्यकता आहे. त्याबाबत, उच्च न्यायालयाचेही अतिशय काटेकोर आदेश आहेत. त्याचे पालन सगळ्यांनी करावे. अनधिकृत पोस्टर, बॅनर, फलक लावला की त्यावर नोटीस आणि गुन्हे दाखल करणे ही कारवाई अतिशय प्रभावीपणे करण्यात यावी, असे निर्देश महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिले आहेत.

ठाणे महापालिका हद्दीत अधिकृत फलक लावण्यासाठी जाहिरात विभागाने जागा निश्चित केल्या आहेत. त्याचे शुल्क भरून केवळ त्याच ठराविक भागात फलक लावता येणार आहेत. त्याबाबत संबंधितांनी सहकार्य करावे असे आवाहन उपायुुक्त शंकर पाटोळे यांनी केले आहे.

प्रभाग हटवलेले फलक गुन्हे

नौपाडा-कोपरी ७६२ ११
वागळे इस्टेट ३७३ २
लोकमान्य/
सावरकरनगर ३४२ १०
वर्तकनगर ४५३ ६

माजिवडा-
मानपाडा ३५३ ७
उथळसर ३३८ ३
मुंब्रा ४५६ १५
कळवा ४०९ १८
दिवा ४०५ ४

एकूण ३८९१ ७६