सर्वाधिक शस्त्रक्रिया सिझरच्या
ठाणे : जिल्हा शासकीय अर्थात सिव्हिल रुग्णालयात दररोज येणा-या रुग्णांची संख्या वाढतच आहे. त्यामुळे वर्षभरात तब्बल ३५०० शस्त्रक्रिया झाल्या आहेत.
रुग्णांवर मोठ्या शस्त्रक्रिया झाल्या तर सर्वांनाच खर्च परवडणारा नसतो. परंतू, अशा रुग्णांसाठी ठाणे सिव्हिल रुग्णालय आधारवड ठरत आहे. गेल्या वर्षभरात विविध प्रकारच्या शस्त्रक्रिया झाल्या आहेत. यामध्ये सर्वाधिक शस्त्रक्रिया सिझर पद्धतीच्या असून, त्या खालोखाल डोळे, दंत अस्थिरोग, कान, नाक आदी शस्त्रक्रियांचा समावेश आहे. महिन्याला सरासरी ३०० ते ३५० शस्त्रक्रिया पार पडत आहेत.
गेल्या वर्षी जून महिन्यात वागळे इस्टेट येथे तात्पुरत्या स्वरूपात सिव्हिल रुग्णालयाचे स्थलांतर करण्यात आले आहे. मात्र त्यावेळी रुग्णांची आबाळ होणार नाही याची काटेकोरपणे दक्षता आरोग्य प्रशासनाने घेतली आहे. रुग्णालयात दर दिवशी सुमारे ५०० ते ६०० रुग्ण उपचार घेण्यासाठी येतात. काहीवेळा या रूग्णांवर लहान व मोठ्या शस्त्रक्रिया पार पाडल्या जातात. जून २०२३-२४ या वर्षभरात ३५०० रूग्णांवर शस्त्रक्रिया केल्या असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. कैलास पवार यांनी दिली.
झालेल्या शस्त्रक्रियांमध्ये सर्वाधिक ‘सिझर’च्या २००० शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. शिवाय जनरल सर्जरी ४००, स्त्रियांचे विविध अजार, २०३ सोबतच डोळ्यांच्या ४५२, दंत २२९, अस्थी २३८ यासह पोट, कान, नाक आदींच्या शस्त्रक्रिया पार पडल्या आहेत.
एक महिन्यापूर्वी अमिबियामुळे यकृतावर आठ फोड आलेल्या गुजरातमधील एका रुग्णावर सिव्हिल रुग्णालयात यशस्वी उपचार करण्यात आले आहेत. सहा महिन्यांपूर्वी गरीब कुटुंबातील एका दोन वर्षाच्या मुलीला जन्मत: मोतीबिंदू झाला होता. रुग्णालयाच्या डॉक्टरांनी प्रथमच दोन्ही डोळ्यांची अवघड शस्त्रक्रिया करून मुलीला दृष्टी दिली आहे. आठ महिन्यांपूर्वी एका महिलेच्या मणक्याची जोखमीची शस्त्रक्रिया करण्यात आली होती.
शस्त्रक्रियेसाठी रुग्णालयात अत्याधुनिक उपकरणे ठेवण्यात आली आहेत. त्यामुळे खाजगी रुग्णालयात महागड्या शस्त्रक्रिया ‘सिव्हिल’मध्ये होतात. काहीवेळा ‘महात्मा ज्योतिबा फुले’या जन आरोग्य योजनेच्या अंतर्गतदेखील रुग्णालयात शस्त्रक्रिया होत असतात. दुर्बिणीद्वारे देखील जोखमीच्या शस्त्रक्रिया पार पडत आहेत, अशी माहिती डॉ. कैलास पवार (जिल्हा शल्यचिकित्सक, ठाणे) यांनी दिली.