नवी मुंबई : नवी मुंबईतील ८२ वर्षीय व्यक्तीने पुलवामा हल्ल्यासह देशविरोधी कृत्यांमध्ये सहभागी असल्याचे सांगून त्यांच्याकडून ३२ लाख रुपये उकळून फसवणूक केल्याचा प्रकार घडला आहे.
नवी मुंबई नेरूळ परिसरात राहणाऱ्या ८२ वर्षीय सेवानिवृत्त अधिकाऱ्याला आणि त्यांच्या पत्नीला फोन करून त्यांच्या आधार कार्डचा गैरवापर करण्यात आला आहे. तुम्ही दोघेही पुलवामा आणि इतर देशविरोधी कारवायांमध्ये सामील असल्याचे दिसून येत आहे आणि तुमच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे, त्यामुळे आम्हाला रिझर्व्ह बँकेत काही पैसे जमा करायचे आहेत असे सांगून चार तासांत तुम्हाला एकूण ३२ लाख रुपये द्यावे लागतील व तुमची तपासणी पूर्ण झाल्यानंतर बँकेत पैसे जमा केले जातील असे सांगण्यात आले. हा फोन आल्यानंतर पती-पत्नी घाबरले आणि त्यांनी पैसे दिले.
त्यानंतर आरोपींनी अधिक भीती दाखवून वृद्ध जोडप्याकडे आणखी पैसे मागितले. त्यानंतर या जोडप्याला आपली फसवणूक झाली असल्याचा संशय आल्याने त्यांनी नवी मुंबई सायबर सेल पोलिसांना घटनेची माहिती दिली आणि पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
या प्रकरणी प्रथमदर्शनी तीन आरोपी निश्चित झाले असून त्यात एका महिलेचा देखील समावेश असून आरोपी सध्या फरार आहेत. अशा गुन्ह्यात एक टोळी सक्रीय असते. बँक खात्याची माहिती घेऊन फसवणूक केली जाते. त्यामुळे या आरोपींचा नवी मुंबई पोलीस शोध घेत आहेत, अशी माहिती नवी मुंबई सायबर सेलचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन कदम यांनी दिली.