अवघ्या १७ दिवसांत ३१ कोटींचा मालमत्ता कर

ठाणे: महापालिका हद्दीतील एकूण मालमत्ताधारकांची संख्या ५ लाख ५५ हजार एवढी आहे. १७ एप्रिलपर्यंत त्यापैकी २५३५२ मालमत्ता धारकांनी ३० कोटी ८२ लाख एवढ्या कर रकमेचा भरणा केला आहे.

यंदाच्या आर्थिक वर्षासाठी महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी मालमत्ता विभागास ८०० कोटी रुपयांच्या वसुलीचे लक्ष्य दिले आहे. पहिल्या सहामाहीच्या मालमत्ता कराच्या सोबत दुसऱ्या सहामाहीचा कर एकत्रितपणे महापालिकेकडे जमा केल्यास कालावधीनिहाय दुसऱ्या सहामाहीच्या सामान्य करामध्ये करदात्यांना सवलत दिली जाते. 15 जूनपर्यंत 10 टक्के, 30 जूनपर्यंत 4 टक्के, 31 जुलैपर्यंत 3 टक्के आणि 31 ऑगस्टपर्यंत कर भरणा केल्यास 2 टक्के सवलत देण्यात येणार आहे.

मालमत्ता कर भरण्यासाठी ठाणे महापालिकेच्या सर्व प्रभाग कार्यालयात संकलन केंद्रे सुरू करण्यात आलेली आहेत. मालमत्ताधारकांना या केंद्रांवर सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळेमध्ये मालमत्ता कर जमा करता येईल. त्याशिवाय, ऑनलाईन कर भरणा सुविधाही कार्यरत आहे.

ठाणे महानगरपालिकेने सन २०२३-२४ या आर्थिक वर्षाची मालमत्ता कराची देयके एक एप्रिल रोजी तयार केली. त्याबाबत करदात्यांना एसएमएस पाठवून लगेच अवगतही करण्यात आले. या एसएमएसमध्ये सन २०२३-२४ या वर्षांची देयके डाऊनलोड, प्रिंट करणे तसेच ऑनलाईन पध्दतीने मालमत्ता कर भरण्याची सुविधा असणारी लिंक देण्यात आली होती. एक एप्रिल रोजी मालमत्ता कराची देयके तयार करण्याचा प्रयोग महापालिकेच्या इतिहासात प्रथमच झाला. त्यास ठाणेकर करदात्यांनी ऑनलाईन पध्दतीने मालमत्ता कर भरुन उत्स्फूर्त प्रतिसादही दिला.

गेल्या आठवड्यापासून महापालिकेच्या प्रभाग कार्यालयाकडील मालमत्ता कर संकलन केंदावर मालमत्ता कर भरण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे. सन 2023-24 या आर्थिक वर्षाची मालमत्ता कराची देयके छपाई करुन प्रभाग स्तरावर करदात्यांस वितरीत करण्यात येणार आहेत. त्यासाठी काही वेळ लागणार आहे. त्यामुळे सध्या करदाते त्यांच्या कराची देयके महापालिकेच्या संकेतस्थळावरुन तसेच कर संकलन केंद्रावरुन घेऊ शकतात.