भिवंडी उत्पादन शुल्क विभागाची कारवाई
भिवंडी : शासनाच्या उत्पादन शुल्क भिवंडी विभागाने वर्षा अखेरीस केलेल्या कारवाईत ३६ गुन्हे उघडकीस आणले असून तीन लाख ७७,४०५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
भिवंडी येथील उत्पादन शुल्क विभागात एकूण तीन बिट असून अधिकारी आणि कर्मचारी मिळून एकूण नऊ जण काम करीत आहेत. या विभागात भिवंडी शहरातील शांतीनगर, शहर पोलीस ठाणे तसेच कल्याण तालुका आणि खडकपाडा पोलीस ठाण्याचे क्षेत्र आहे. या कार्यक्षेत्रांतर्गत ढाबे, अवैध दारूची वाहतूक आणि बेकायदेशीर दारू विक्री यांच्यावर कारवाई करून ३१ गुन्हे दाखल करून तीन लाख ६५,२३५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून त्यामध्ये दोन दुचाकींचा समावेश आहे. तसेच ३१ डिसेंबरच्या कारवाईत ढाबा, दारूविक्री आणि उघड्यावर दारू पिणे अशा एकूण पाच गुन्ह्यांमध्ये पाच जणांविरोधात कारवाई करण्यात आली. या कारवाईत गुन्हे दाखल करून २० लिटर गावठी दारू, साडेसात लिटर विदेशी दारू आणि आठ लिटर देशी दारू असा एकूण १२,१७० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
ही कारवाई भिवंडी विभागाचे मुख्य पोलीस निरीक्षक सुभाष खंडेराय यांच्या मार्गदर्शनाने करण्यात आली. या घटनेने अवैध दारू विक्री करणारे आणि उघड्यावर दारू पिणाऱ्या तळीरामांचे धाबे दणाणले आहेत.