जुन्या २६० कामगारांना विना नोटीस कामावरून काढले

माजी आमदार नरेंद्र पवार यांचा मिरॅकल व्यवस्थापनाला इशारा

अंबरनाथ: कंपनीतून कामावरून काढून टाकलेल्या कामगारांना व्यवस्थापनाने त्वरित कामावर घेतले नाही तर उग्र आंदोलन छेडावे लागेल प्रसंगी अंबरनाथ बंद पुकारला जाईल, असा इशारा भाजपचे माजी आमदार नरेंद्र पवार यांनी कंपनी व्यवस्थापनाला दिला. कामगारांवर झालेल्या अन्यायाविरोधात गेल्या २५ दिवसांपासून कंपनीबाहेर आंदोलन सुरु आहे.

येथील आनंदनगर औद्योगिक वसाहतीमधील मिरॅकल कंपनीने २० वर्षांपाहून अधिक काळ काम केलेल्या २६० कामगारांना नोटीस न देता अचानक कामावरून तडकाफडकी काढून टाकले. कंपनी व्यवस्थापनाच्या निषेधार्थ ८ मार्चपासून कामगारांनी कंपनीबाहेर आंदोलन सुरु केले. त्याला ५२ दिवस झाले, तरीही व्यवस्थापनाने ठोस कार्यवाही केली नाही.

कामावरून काढून टाकलेल्या कामगारांना न्याय मिळावा यासाठी महाराष्ट्र परिश्रम संघटनेचे अध्यक्ष तथा माजी आमदार नरेंद्र पवार यांनी आज सोमवार (२८) एप्रिल रोजी कामगारांना भेट दिली. आणि कंपनीबाहेर झालेल्या द्वारसभेत कंपनी व्यवस्थापनाच्या मुजोरीचा तीव्र शब्दात निषेध केला.

कंपनीतील २६० कामगारांना काढून टाकणे अयोग्य असून व्यवस्थापनाने रीतसर बोलणी टाळली आहेत. व्यवस्थापनाविरोधात मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस, उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार डॉ. बालाजी किणीकर यांच्याशी बोलणी झाली आहेत. सर्वपक्षीयांनी कामगारांच्या हिताचा निर्णय घेण्याची मागणी करत भाजपाला पाठिंबा दिला आहे. कंपनीत कामगार कायद्याची पायमल्ली होत आहे. सर्वपक्षीयांचा पाठींबा असूनही मुजोर व्यवस्थापन जुमानत नसल्याने व्यवस्थापनाविरोधात रस्त्यावर उतरून उग्र आंदोलनाचा इशारा संघटनेचे अध्यक्ष पवार यांनी दिला.