ठाणे जिल्ह्यात २४४ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात

९० उमेदवारांचे अर्ज मागे

ठाणे: ठाणे ‍जिल्ह्यातील 18 विधानसभा मतदारसंघात एकूण 381 उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. त्यापैकी एकूण 334 उमेदवारांचे अर्ज वैध तर 47 उमेदवारांचे अर्ज अवैध ठरले होते. वैध ठरलेल्या 334 उमेदवारांपैकी आज शेवटच्या दिवशी एकूण 90 उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले.

ठाणे जिल्ह्यातील 18 विधानसभा मतदारसंघात एकूण 244 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.मीरा-भाईंदर विधानसभा मतदारसंघातून एकूण 23 उमेदवार वैध ठरले होते, त्यापैकी सहा उमेदवारांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत. ओवळा माजिवडा विधानसभा मतदारसंघातून एकूण 17 उमेदवार वैध ठरले होते, त्यापैकी तीन उमेदवारांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत. आता शिवसेना शिंदे गटाचे प्रताप सरनाईक, ठाकरे गटाचे नरेश मणेरा, मनसेचे संदीप पाचंगे आदी १४ उमेदवार उरले आहेत.
कोपरी पाचपाखाडी मतदारसंघातून एकूण 12 उमेदवार वैध ठरले होते, त्यापैकी तीन उमेदवारांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले. आता शिवसेनेचे एकनाथ शिंदे, ठाकरे गटाचे केदार दिघे, अपक्ष मनोज शिंदे यांच्यासह नऊ उमेदवार उरले आहेत.
ठाणे मतदार संघातून एकूण 10 उमेदवार वैध ठरले होते. त्यापैकी दोन उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले. आता रिंगणात भाजपाचे संजय केळकर, ठाकरे गटाचे राजन विचारे, मनसेचे अविनाश जाधव यांच्यासह नऊ उमेदवार उरले आहेत.

मुंब्रा कळवा मतदारसंघातून एकूण 21 उमेदवार‌ वैध ठरले होते, त्यापैकी 10 उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत. आता रिंगणात राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे जितेंद्र आव्हाड, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नजीब मुल्ला, मनसेचे सुशांत सूर्यराव यांच्यासह ११ जण उरले आहेत.

ऐरोली मतदारसंघातून एकूण 20 उमेदवार‌ वैध ठरले होते, त्यापैकी तीन उमेदवाराने आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत. आता भाजपचे गणेश नाईक, मनसेचे निलेश बाणखेले, ठाकरे गटाचे मनोहर मढवी, अपक्ष विजय चौघुले यांच्यासह १७ उमेदवार रिंगणात उरले आहेत. बेलापूर मतदारसंघातून एकूण 24 उमेदवार‌ वैध ठरले होते, त्यापैकी नऊ उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत. आता निवडणुकीचे रिंगणात अपक्ष विजय नाहटा, राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे संदिप नाईक, मनसेचे गजानन काळे, भाजपाच्या मंदा म्हात्रे यांच्यासह १५ उमेदवार शिल्लक राहिले आहेत.

भिवंडी ग्रामीण मतदारसंघातून एकूण 11 उमेदवार वैध ठरले होते, त्यापैकी चार उमेदवारांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत. रिंगणात ठाकरे गटाचे महादेव घाटाळ, मनसेचे वनिता कथोरे, शिंदे गटाचे शांताराम मोरे यांच्यासह सात उमेदवार उरले आहेत. शहापूर मतदारसंघातून एकूण 11 उमेदवार वैध ठरले होते. त्यापैकी आज दोन उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले. रिंगणात राष्ट्रवादी काँग्रेसचे दौलत दरोडा, शरद पवार गटाचे पांडुरंग बरोरा, मनसेचे हरिश्चंद्र (हॅरी) बांगो खंडवी यांच्यासह नऊ उमेदवार उरले आहेत. भिवंडी (पश्चिम) मतदारसंघातून 26 उमेदवार वैध ठरले होते. त्यापैकी 12 उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले. यात मनसेचे भारत पाटील यांचा समावेश आहे. आता भाजपचे महेश चौघुले, काँग्रेसचे दयानंद चोरघे, बसपाचे मोबिन शेख, सपाचे रियाझ आझमी, वंचितचे जाहीद अन्सारी एआयएमआयएमचे वारीस पठाण, अपक्ष विलास पाटील यांच्यासह १४ उमेदवार रिंगणात उरले आहेत. भिवंडी पूर्व मतदार संघातून एकूण 17 उमेदवार वैध ठरले होते. त्यापैकी सहा उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले. यात अपक्ष रुपेश म्हात्रे यांचा समावेश आहे. आता मतदारसंघात बसपाचे परशूराम पाल, मनसेचे मनोज गुळवी, शिंदे गटाचे संतोष शेट्टी,सपाचे रईस शेख यांच्यासह ११ जण उरले आहेत.

कल्याण पश्चिम मतदारसंघात एकूण 30 उमेदवार वैध ठरले होते. आज सहा उमेदवारांनी अर्ज मागे घेतले आहेत. यात अपक्ष अरविंद मोरे, नरेंद्र पवार यांचा समावेश आहे. आता मतदारसंघात मनसेचे उल्हास भोईर, वंचितचे अय्याज मौलवी, शिवसेनेचे विश्वनाथ भोईर, ठाकरे गटाचे सचिन दिलीप बासरे,अपक्ष राकेश मुथा आणि राम पंडागळे यांच्यासह २४ उमेदवार शिल्लक राहिले आहेत.

मुरबाड विधानसभा मतदारसंघातून एकूण 12 उमेदवार वैध ठरले आहेत, त्यापैकी तीन उमेदवारांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत. अंबरनाथ विधानसभा मतदारसंघातून एकूण 24 उमेदवार वैध ठरले होते, त्यापैकी 2 उमेदवारांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत. उल्हासनगर विधानसभा मतदारसंघातून एकूण 26 उमेदवार वैध ठरले होते, त्यापैकी 7 उमेदवारांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत.

कल्याण पूर्व मतदारसंघातून एकूण 24 उमेदवार वैध ठरले होते, सात उमेदवारांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत. डोंबिवली विधानसभा मतदारसंघातून एकूण 12 उमेदवार वैध ठरले होते, त्यापैकी चार उमेदवारांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत. कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघातून एकूण 14 उमेदवार वैध ठरले होते, त्यापैकी एका उमेदवारांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत.