मालमत्ता हस्तांतरणाची २२ हजार प्रकरणे प्रलंबित

दोन दिवसांत प्रकरणे मार्गी लावण्याची काँग्रेसची मागणी

ठाणे : ठाणे महापालिकेचा आणखी एक भोंगळ कारभार समोर आला आहे. महापालिकेच्या नऊ प्रभाग समिती अंतर्गत तब्बल २२ हजार मालमत्ता हस्तांतरणाची प्रकरणे धूळखात पडली असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

केवळ सहायक आयुक्तांच्या सह्या शिल्लक असल्याची माहिती देखील समोर आली आहे. येत्या दोन दिवसांत ही प्रकरणे मार्गी लावावी अन्यथा काँग्रेसतर्फे आंदोलन केले जाईल, असा इशारा ठाणे काँग्रेसने दिला आहे.

गुरुवारी ठाण्यात घेण्यात आलेल्या एका पत्रकार परिषदेत शहर अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी याबाबतचे पुरावेच सादर केले. वर्तकनगर प्रभाग समिती अंतर्गत शिवसेनेच्या माजी नगरसेवकाने मालमत्ता हस्तांतरणाचे प्रकरण मार्गी लागत नसल्याची तक्रार आमच्याकडे केली होती. त्या अनुषगाने याची माहिती घेतली असता एकट्या वर्तकनगर प्रभाग समितीमध्ये मागील वर्षभरापासून ३३८ प्रकरणे केवळ सहाय्यक आयुक्ताच्या एका सहीसाठी प्रलंबित असल्याची माहिती समोर आली आहे. तर लोकमान्य प्रभाग समितीमध्ये २९० प्रकरणे अद्याप मार्गी लागू शकली नसल्याची माहिती देखील श्री.चव्हाण यांनी यावेळी दिली. केवळ या दोन प्रभाग समितीतच नाही तर सर्व नऊ प्रभाग समितीमध्ये २२ हजार प्रकरणे रखडल्याची माहिती देत असताना काही निवडक प्रकरणे विनाविलंब हस्तांतरीत होत असल्याचा आरोप श्री.चव्हाण यांनी केला.

यात कळवा, मुंब्रा आणि दिव्यात सर्वाधिक प्रकरणे असल्याचेही त्यांनी सांगितले. या समितीमध्ये दोन हजार ते २२०० प्रकरणे प्रलंबित असल्याचा आरोपही चव्हाण यांनी यावेळी केला. मात्र काही हस्तांतर प्रकरणे भ्रष्टाचार करित त्वरित मार्गी लावली जात आहेत. यामध्ये कोणते अधिकारी सहभागी आहेत याची माहीती घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी श्री.चव्हाण यांनी केली, पुढील दोन दिवसांत ही सर्व प्रकरणे मार्गी लागली नाहीत तर काँग्रेस आंदोलन करेल, असा इशाराही त्यांनी दिला.