* ११ महिन्यांत ११०० अपघात
* सर्वाधिक अपघात दुचाकीस्वारांचे
ठाणे: मागील वर्षाच्या तुलनेत यावर्षी अकरा महिन्यात तब्बल ११०० अपघात झाले असून त्यामध्ये २१५ जणांचा मृत्यू झाला. यात सर्वाधिक दुचाकी चालकांचा समावेश असून हे वर्ष अपघात वर्ष ठरले आहे.
ठाणे पोलीस आयुक्तालय परिसरातील रस्त्यांचे सिमेंट काँक्रीटिकारण आणि रुंद रस्त्यांमुळे वाहनांची गती वाढली आहे. दुसरीकडे रस्त्यांची विविध कामे सुरु असून अनेक ठिकाणी रस्त्यांवर खड्डे पडलेले आहेत. त्यामुळे अपघात होणाऱ्या ब्लॅक स्पॉटची संख्या देखिल वाढली आहे. वाहतुकीचे नियम न पाळणाऱ्यांचीही संख्या वाढलेली आहे. त्यामुळे अंतर्गत रस्त्यांवरही अपघात होऊ लागले आहेत.
जानेवारी ते नोव्हेंबर या 11 महिन्यांच्या कालावधीत झालेले अपघात गेल्या वर्षाच्या एकूण अपघातांपेक्षा वाढले आहेत. गंभीर अपघातांमध्ये सर्वाधिक संख्या दुचाकी चालविणाऱ्यांची असून हेल्मेटचा वापर न केल्याने या अपघातात सर्वाधिक मृत्यू झाले आहेत. एकूण १०५२ अपघातांमध्ये तब्बल ६२५ अपघात दुचाकीस्वारांचे आहेत. घोडबंदर महामार्गावरील कापुरबावडी येथील माजिवडा ब्लॅक स्पॉट म्हणून गंभीर अपघातांसाठी सर्वाधिक धोकादायक झाल्याचे अपघातांच्या आकडेवारीवरून दिसून येत आहे. अकरा महिन्यांत या ठिकाणी २५ अपघात झाले असून त्यामध्ये 12 गंभीर आणि 5 किरकोळ अपघातांचा समावेश आहे. यात नऊ जणांचा मृत्यू झाला असून सर्वाधिक दहा जणांचा नारपोली येथील माणकोली नाका या ब्लॅक स्पॉटवर झाले आहे. तर ठाणे शहर वाहतूक हद्दीतील २५ ब्लॅक स्पॉटच्या ठिकाणी झालेल्या गंभीर अपघातात एकूण 59 जणांचा जीव गेला आहे.
चुकीच्या दिशेने दुचाकी चालवणे, हेल्मेट न वापरणे, टायरची काळजी न घेणे आणि सर्वात धोकादायक म्हणजे ब्लाइंड स्पॉट परिसरात वाहन चालवले जात असल्याने अपघातांची संख्या वाढत असल्याचे एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले.
रस्ता ओलांडणाऱ्या, सायकल-मोटार सायकल स्वारांकरिता सर्वात जास्त धोकादायक स्पॉट हे ब्लॅक स्पॉट असतात. ९० टक्के मृत्यू या स्पॉटमुळे होतात. ट्रक चालवताना ट्रक चालकांना हे स्पॉट दिसून येत नाहीत. ट्रक चालकाला सुमारे दहा फुटापर्यंत त्याच्या वाहनासमोर कोण आहे हे दिसत नाही. ट्रकच्या मागे काही फुटाच्या अंतरावर असलेले वाहन, व्यक्ती ट्रक चालकाला आरशात दिसून येत नाही. अशा जागांना ब्लाइंड स्पॉट म्हणतात. हे स्पॉट फारच धोकादायक असतात. त्यामुळे रस्ता ओलांडताना दोन्ही बाजूला पाहून मोटार गाडी दहा फुटांच्या अंतरावर असताना रस्ता ओलांडून नये अथवा त्याच्या आसपास येऊ नये, धावत्या ट्रकच्या मागोमाग जवळच्या अंतरावर वाहन चालवू नये. ही ठिकाणे ट्रक चालकाला आरशात दिसून येत नाहीत. त्यामुळे पादचाऱ्यांनी काळजी घ्यावी, असे देखिल वाहतूक विभागाच्या अधिकाऱ्याने सांगितले
जानेवारी ते नोव्हेंबर या ११ महिन्यांत अपघातात २१५ जणांचा मृत्यू, मागील वर्षी १८४ जणांचा मृत्यू, मागील वर्षापेक्षा यंदा 31 अपघात जास्त
यंदा ११ महिन्यांत ५५७ गंभीर अपघात, मागील वर्षी ५३० अपघात, यंदा २७ अपघात जास्त
यंदा किरकोळ अपघात २७९, गत वर्षी २४१ अपघात, यंदा ३८ अपघात जास्त
गत वर्षाच्या तुलनेत अपघातात मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या ३१ ने जास्त तर अपघातांची संख्या ९७ ने वाढली आहे.
ब्लॅक स्पॉट
माजिवडे, वाघबीळ, ओवळा सिग्नल, ब्रह्मांड सिग्नल, गायमुख, कोपरी पूल, तीन हात नाका, नितीन नाका, दिवागाव, खारीगांव पूल, कशेळी पूल, घोडबंदर रोड, खारीगाव टोल नाका, आनंदनगर, रेती बंदर, विजय सेल्स टाटा नाका, मानकोली नाका, पिंपळास फाटा, धामणकर नाका, राजनोली नाका, कल्याण फाटा, शीळ फाटा, ऑर्डनन्स फॅक्टरी, वॉलधूनी पूल, विको नाका