ठाण्यात गेल्या चार महिन्यात २०० मद्यपी जाळ्यात

ठाणे: ठाणे प्रादेशिक परिवहन विभागाच्या वायुवेग पथकाने सप्टेंबर ते डिसेंबर या चार महिन्यात ड्रंक अँड ड्राईव्ह तपासणी मोहिम राबवली आहे. यात मद्य प्राशन करून वाहन चालवणाऱ्या २०० चालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.

दारूची नशा करून अनेक चालक वाहन चालवतात. यातून अपघात देखील घडले आहेत. वाहतूक नियमानुसार मद्यप्राशन करून गाडी चालवणे चुकीचे आहे. मात्र या नियमांकडे चालक दुर्लक्ष करत आहेत. तळीराम वाहन चालकांना अद्दल घडावी यासाठी ठाणे प्रादेशिक परिवहन विभाग सतर्क झाले आहे. त्यानुसार या विभागाने ड्रंक अँड ड्राईव्हची विशेष तपासणी मोहीम राबवली आहे. यात मागील चार महिन्यांत २०० चालकांवर दंडात्मक कारवाई केली असल्याची माहिती प्रादेशिक परिवहन अधिकारी हेमांगिनी पाटील यांनी दिली. ठाणे शहराबरोबर भिवंडी, मीरा-भाईंदर शहरात विभागाचे वायुवेग पथक कारवाई करत आहेत. दुचाकी, कार, बस, ट्रक, मालवाहतूक वाहने आदी चालकांची तपासणी केली जात आहे.

सप्टेंबर महिन्यात ३७, ऑक्टोंबर २१, नोव्हेंबर ३३ आणि डिसेंबर महिन्यात ७९ चालकांवर ड्रंक अँड ड्राईव्ह तपासणी करून कारवाई करण्यात आली आहे. महत्वाचे म्हणजे सायंकाळनंतर देखील विभागाचा वायुवेग पथक कार्यरत आहे. गेल्या काही दिवसांत मद्य प्यायलेल्या २५ चालकांवर अशाप्रकारे कारवाई करण्यात आली आहे.

नवीन वर्षाच्या स्वागताची तयारी सर्वच ठिकाणी बघायला मिळत आहे. त्यामुळे ठिकठिकाणी सेलिब्रेशन कार्यक्रमाचे आयोजन देखील करण्यात आले आहे. मात्र या दरम्यान कोणी मद्य पिऊन वाहन चालवू नये. प्रादेशिक परिवहन विभागाचे वायुवेग पथक मोक्याच्या जागेवर गस्त घालत असून, दारू पिऊन वाहन चालवताना आढळून आल्यास कडक कारवाई केली जाणार असल्याचा इशारा प्रादेशिक परिवहन अधिकारी हेमांगीनी पाटील यांनी दिला आहे.