घोडबंदर टँकरमुक्त करण्यासाठी भातसातून २० एमएलडी पाणी

* सुर्या’चे पाणी मिळण्यासाठी प्रयत्न सुरू
* आमदार संजय केळकर यांची अधिकाऱ्यांशी विविध समस्यांवर चर्चा

घोडबंदर भागातील वाढती बांधकामे आणि लोकसंख्या यामुळे येथील गृहसंकुलांना टँकरच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागत असून विविध स्त्रोतांतून अतिरिक्त पाणी पुरवठा या भागाला मिळवून देण्यासाठी प्रयत्न सुरू असून लवकरच हा परिसर टँकरमुक्त होईल, असा विश्वास आमदार संजय केळकर यांनी व्यक्त केला.

घोडबंदर परिसरातील पाणी टंचाईग्रस्त गृहसंकुलाचे अनेक प्रतिनिधींनी आज आमदार संजय केळकर यांची महापालिका मुख्यालयातील भाजपा गटनेते कार्यालयात भेट घेतली. यावेळी ठामपा पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता विनोद पवार हे देखील उपस्थित होते.

घोडबंदर वासियांना होणारा अपुरा पाणीपुरवठा आणि वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेत कमी पडत असलेली पाणी वितरण व्यवस्था यांच्याबाबत दीर्घकालीन उपाययोजना म्हणुन भातसा धरणातून २० एमएलडी पाण्याची तरतुद करावी. अशी सुचना आमदार संजय केळकर यांनी ठाणे महापालिकेला केली. यावर प्रशासनाने सहमती दर्शविली असल्याची माहिती श्री.केळकर यांनी दिली. सुर्या धरणाचे पाणी मीरा-भाईंदर महापालिकेला मिळत आहे, त्या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिकेलाही पाणी मिळावे यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे श्री.केळकर यांनी सांगितले.

माजीवड्यापासून उर्वरित घोडबंदर पट्ट्यात पाण्याच्या टाक्या आहेत, पण पुरेसा पाणी पुरवठा नसल्याने स्थानिक रहिवाशांना पुरेसे पाणी मिळत नाही. अमृत योजनेमधून पाण्याचे समतोल वितरण व्हावे यासाठी आता जलकुंभ उभारण्यात येत आहे. त्यामुळे समान पाणी वाटप होऊ शकेल, असेही श्री. केळकर यांनी सांगितले. स्टेमकडून अतिरिक्त पाणी मिळावे यासाठी देखील पाठपुरावा सुरू आहे. त्यामुळे घोडबंदर परिसर लवकरच टँकरमुक्त होईल, असा विश्वास आमदार संजय केळकर यांनी व्यक्त केला.

अनधिकृत शाळाप्रकरणी अजामीनपात्र गुन्हे दाखल होणार

ठाण्यात विशेषतः दिवा भागात अनधिकृत शाळांचे पेव फुटले असून या प्रकरणी नोटीसा बजावल्या जातात, दंड आकारला जातो, पण पुन्हा या शाळा छुप्या पद्धतीने सुरू राहतात. यात विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात आले असून यापुढे या शाळांच्या संचालकांवर अजामिनपात्र गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचे शिक्षण मंडळाचे उपायुक्त सचिन पवार यांनी कबूल केले असल्याची माहिती आमदार संजय केळकर यांनी दिली.

लवकरच फेरीवाला धोरण

फेरीवाला धोरण अंमलात येऊच नये म्हणून काही असामाजिक घटकांचे रॅकेट कार्यरत आहे. मात्र गणेशोत्सवानंतर फेरीवाला समितीच्या निवडणुका होऊन हे धोरण लवकरच अमलात येईल, अशी माहिती आमदार संजय केळकर यांनी दिली.