‘महारेरा’ने जिल्हाधिका-यांना दिले पत्र
ठाणे : ठाण्यात 195 घरखरेदीदारांचे 143.67 कोटी रुपये नुकसान भरपाई थकली असून यापैकी फक्त पाच विकासकांकडे 107 कोटी रुपये अडकलेले आहेत. ही रक्कम जिल्हाधिकारी कार्यालयाने वसूल करण्यासाठी विशेष प्रयत्न केले तर एकूण रकमेच्या तब्बल 75 टक्के रक्कम वसूल होऊन अनेक घरखरेदीदारांना दिलासा मिळणार आहे.
घर खरेदीदारांच्या विविध स्वरूपाच्या तक्रारींवर रितसर सुनावणी होऊन प्रकरणपरत्वे व्याज/नुकसान भरपाई/ परतावा आदी विहित कालावधीत देण्याचे आदेश संबंधित विकासकांना ‘महारेरा’कडून दिले जातात. दिलेल्या कालावधीत विकासकांनी रक्कम दिली नाहीतर ती वसूल करून देण्यात जिल्हाधिकारी कार्यालयाची भूमिका महत्वाची असते.
ठाणे जिल्ह्यात 98 प्रकल्पांत 222 घरखरेदीदार तक्रारदारांचे 155.32 कोटी वसूल व्हायचे होते. यापैकी आतापर्यंत 15 प्रकल्पांत 27 घर खरेदीदारांचे 11.65 कोटी वसूल झालेले आहेत. पालघर जिल्ह्यातही 33 प्रकल्पांकडे 79 घरखरेदीदारांचे 28.19 कोटी रुपये वसूल व्हायचे आहेत. येथेही फक्त तीन विकासकांकडे यापैकी 12 कोटी अडकले असून ती वसूल झाल्यास 42टक्के वसुली होऊन अनेक घर खरेदीदारांना दिलासा मिळणार आहे. पालघर जिल्ह्यात 39 प्रकल्पांत 88 घरखरेदीदार तक्रारदारांचे 32.75 कोटी वसूल व्हायचे होते. यापैकी आतापर्यंत सहा प्रकल्पांत नऊ घर खरेदीदारांचे 4.56 कोटी वसूल झालेले आहेत.
रायगड जिल्ह्यात 33 प्रकल्पांतील 65 घरखरेदीदारांचे 30.92 कोटी रुपये वसूल व्हायचे आहेत. यातही फक्त पाच विकासकांकडे 19 कोटी अडकलेले असून जिल्हाधिकारी कार्यालयाने ही रक्कम वसूल केल्यास अनेक घरखरेदीदारांना दिलासा मिळून एकूण रकमेच्या 62टक्के वसुली होणार आहे. रायगड जिल्ह्यात 52 प्रकल्पांत 124 घरखरेदीदार तक्रारदारांचे 38.79 कोटी वसूल व्हायचे होते. यापैकी आतापर्यंत 19 प्रकल्पांत 59 घर खरेदीदारांचे 7.87 कोटी वसूल झालेले आहेत.
अहवाल अद्ययावत न करणाऱ्या प्रकल्पांचे बँक खाते गोठवणार
गृहनिर्माण प्रकल्पांचा त्रैमासिक प्रगती अहवाल ‘महारेरा’च्या संकेतस्थळावर अद्ययावत करणा-या गृहनिर्माण प्रकल्पांची संख्या लक्षणीयरित्या वाढली आहे. या प्रकल्पांचा आढावा घेण्यासाठी ‘महारेरा’ने सुरुवात केली तेव्हा हे प्रमाण 0.02टक्के म्हणजे, तेव्हा 748 असे नगण्य होते. मात्र आता ‘महारेरा’च्या सततच्या पाठपुराव्यामुळे आणि प्रतिसाद न देणा-यांवर प्रकल्पाचे बँक खाते गोठवून ‘महारेरा नोंदणी ’क्रमांक स्थगित करण्यासारखी कठोर कारवाई सुरू केल्याने हा प्रतिसाद वाढलेला आहे. सध्या राज्यात 18,012 कार्यरत प्रकल्प आहेत. यापैकी 11,080 प्रकल्प ही त्रैमासिक प्रपत्रे अद्ययावत करीत आहेत. राज्यात सध्या 62टक्के गृहनिर्माण प्रकल्प महारेरा‘च्या संकेतस्थळावर त्रैमासिक माहिती अद्ययावत करीत आहेत.