मुंब्र्यात विकास आघाडी तर ठाण्यातून थेट प्रवेश
ठाणे: राष्ट्रवादी कॉंग्रेसचे १३ नगरसेवक शिंदे गटाची साथ देणार असून मुंब्रा येथील सात नगरसेवक बाहेरून तर ठाण्यातील चार जण थेट प्रवेश करणार आहेत. कळव्यातील दोन नगरसेवकांशी बोलणी चालू असल्याचे कळते. राष्ट्रवादी फोडून मुंब्रा येथिल राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना शह देण्यासाठी ही खेळी खेळली जात असल्याचे राजकीय निरीक्षकांचे मत आहे.
मुंब्रा येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक राजन किणे, त्यांच्या पत्नी अनिता आणि दोन भाऊ, राजू अन्सारी यांच्या घरातील दोन महिला नगरसेविका, विश्वनाथ भगत, ठाण्यातील ज्येष्ठ नगरसेवक हणमंत जगदाळे यांचे चार जणांचे पॅनेल अशा एकूण ११ नगरसेवकांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसला रामराम ठोकण्याचा निर्णय पक्का केला आहे तर कळवा येथील दोन नगरसेवकांबरोबर शिंदे गटाने चर्चा केली असून त्यांचाही निर्णय होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
याबाबत राजन किणे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की मुंब्रा विकास आघाडीची नोंदणी सुरू आहे. आम्ही राष्ट्रवादी सोडण्याचा निर्णय घेतला आहे. नजीब मुल्ला यांनी 2009 साली येथे राष्ट्रवादी वाढवली, त्याच श्री. मुल्ला यांचे मुंब्रा-कळवा परिसरात बॅनर लावण्यास एका नेत्याने मनाई केली होती. आम्ही राजकीय स्पर्धक असतानाही सर्व हेवेदावे विसरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता, परंतु मागील पाच वर्षात मलाच जास्त त्रास दिला गेला असेल तर गद्दारी कोणी आणि का केली याचा विचार त्यांनीच करावा, असा टोला किणे यांनी लगावला आहे. माझ्यासारखे अनेकजण त्रासले असून निवडणूक येईपर्यंत अनेकजण आघाडीत येतील, असा विश्वास श्री. किणे यांनी व्यक्त केला आहे.
मुंब्रा येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक आणि पदाधिकारी मुंब्रा विकास आघाडीची स्थापना करणार असून त्या माध्यमातून महापालिकेच्या आगामी निवडणुकीत बाळासाहेबांच्या शिवसेनेबरोबर युती करणार आहेत तर कळवा आणि जगदाळे यांच्या पॅनलमधील माजी नगरसेवक, पदाधिकारी हे शिंदे गटात थेट प्रवेश करणार असल्याचे एका नगरसेवकाने सांगितले.