भूसंपादनाअभावी दिव्यातील १०० खाटांचे रुग्णालय रखडले

राज्य शासनाचा ५८ कोटींचा निधी पडून

ठाणे : दिव्यातील १०० खाटांच्या नियोजित रुग्णालयासाठी आरक्षित भूखंड उपलब्ध असून आजतागायत त्याचे भूसंपादन जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत झालेले नाही. त्यामुळे राज्य शासनाने दिलेला ५८ कोटींचा निधी ठाणे महापालिकेकडे पडून असल्याची बाब उघडकीस आली आहे. त्यामुळे महापालिकेने पुन्हा एकदा जिल्हा प्रशासनाला भूसंपादनासाठी पत्र दिले आहे.

माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिवा येथे सुसज्ज व अद्ययावत रुग्णालयाची उभारणी करण्याची घोषणा २०२३ साली केली होती. आगासन येथील आरक्षित जागेवर २५ हजार चौरस मीटर जागेवर हे रुग्णालय उभारले जाणार आहे. मात्र, या रुग्णालयाच्या उभारणीसाठी जागा मिळावी, यासाठी जागा भूसंपादनाचा प्रस्ताव २०२१ मध्ये महापालिकेने जिल्हाधिकारी कार्यालयाला सादर केला आहे. चार वर्षाचा काळ उलटूनही अद्याप जागा संपादित करण्यात आली नसल्याने दिवेकरांना रुग्णालयासाठी आणखी प्रतीक्षा करावी लागणार आहे.

दिवा शहराचे नागरीकरण झपाट्याने वाढत आहे. त्या तुलनेत दिवावासियांना देण्यात येणाऱ्या सोयी-सुविधा मात्र अपुऱ्या आहेत. महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी नुकत्याच सादर केलेल्या अर्थसंकल्पात दिवा येथे रुग्णालय उभारण्याची घोषणा केली होती. माजी मुख्यमंत्री तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिवावासियांसाठी सुसज्ज हॉस्पिटल उभारण्यात येणार असल्याची घोषणा केली होती. त्याची अमलबजावणी महापालिका प्रशासन करणार आहे. त्यानुसार आगासन भागातील १३.८७ हेक्टर जागेवर एकाच छताखाली नऊ आरक्षणे विकसित करण्याचे महापालिकेने निश्चित केले आहे. याठिकाणी असलेली जागा ही मालकी हक्काची आहे. तसेच या ठिकाणी काही रहिवाशांची जुनी घरे देखील आहेत.

या ठिकाणी आरक्षण विकसित करण्याच्या उद्देशाने महापालिकेने २०२१ मध्ये जिल्हाधिकारी कार्यालयाकडे भुसंपादनासाठी प्रस्ताव सादर केला आहे. परंतु अद्याप येथील सर्वेक्षणच पूर्ण न झाल्याने प्रस्ताव देखील मार्गी लागू शकलेला नाही. येथील भुसंपादनासाठी शासनाकडून ५८ कोटींचा निधी प्राप्त झालेला आहे. त्यामुळे याचा बोजा देखील महापालिकेवर असणार नाही. असे असले तरी देखील येथील रहिवासी सर्वेक्षण करण्यास देत नसल्याने येथील भुसंपादन अद्याप महापालिकेला करता आलेले नाही.

दरम्यान, या ठिकाणी असलेल्या २५ हजार चौरस मीटर क्षेत्रावर १०० रुग्णशय्यांचे रुग्णालय विकसित केले जाणार आहे. ठाणे महापालिका दिवा, आगासन भागातील १३.८७ हेक्टर जागेवर एकाच छताखाली सर्व प्रकारची कार्यालये आणली जाणार आहेत. त्यात हॉस्पीटल, प्रभाग समिती कार्यालय, अग्निशमन केंद्र, पोलीस स्टेशन, बसथांबा, रस्ता, संप पंप हाऊस तसेच अन्य सुविधांचा समावेश आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयाला दिले पुन्हा पत्र

येथील रहिवाशी सर्व्हे करण्यास विरोध करीत असल्याने आता डिसेंबर २०२४ मध्ये महापालिकेने जिल्हाधिकारी कार्यालयाला पत्र दिले असून या पत्रानुसार येथील हॉस्पीटलची गरज लक्षात घेऊन येथील भुसंपादनाची प्रक्रिया पूर्ण करावी, तसा अभिप्राय न्यायालयात सादर करुन पुढील प्रक्रिया करावी असे सांगितले आहे