ठाणे: राज्य सरकारच्या नगरविकास विभागातर्फे घेण्यात आलेल्या शहर सौदर्यीकरण व स्वच्छता स्पर्धा-२०२२ मध्ये ‘अ’ व ‘ब’ वर्ग महानगरपालिका गटात ठाणे महानगरपालिकेने दुसरा क्रमांक पटकाविला आहे.
नागरी प्रशासनात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या महापालिकांच्या पहिल्या गटातही ठाणे महापालिकेस दुसरा क्रमांक मिळाला आहे. नगरविकास दिनाच्या निमित्ताने गुरूवारी मुंबईत झालेल्या कार्यक्रमात या स्पर्धांचा निकाल जाहीर करण्यात आला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ठाणे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांना दुसऱ्या क्रमांकाचे दहा कोटी रुपयांचे पारितोषिक व प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.
याप्रसंगी, विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर, शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर, मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव मुंबई महापालिकेचे आयुक्त आय. एस. चहल आणि नगरविकास विभागाच्या प्रधान सचिव (२) सोनिया सेठी आदी उपस्थित होते.