भाईंदर : मीरा-भाईंदर महापालिका क्षेत्रातील मीरा रोड येथील छत्रपती शिवाजी महाराज मार्गावरील प्लेझेंट पार्क सिग्नल ते सिल्व्हर पार्क सिग्नलपर्यंतच्या नवीन डबल डेकर उड्डाणपुलाचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. डिव्हायडर, रिफ्लेक्टर, रंगकाम अशी काही कामे येत्या आठवडाभरात पूर्ण होतील. फिनिशिंगचे काम अंतिम टप्प्यात आले असून या महिन्यातच सर्व आवश्यक काम पूर्ण करून हा उड्डाणपूल नागरिकांसाठी खुला करण्यात येणार आहे.
मुंबई महानगरात वर मेट्रो आणि खाली उड्डाणपुलाचा हा एकात्मिक पूल एक किलोमीटर लांबीचा आहे. आमदार प्रताप सरनाईक म्हणाले की, मीरा-भाईंदरच्या लाखो वाहनचालकांना याचा मोठा फायदा होणार आहे. या उड्डाणपुलाचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करावे, अशी विनंती आमदार सरनाईक यांनी केली आहे. मंगळवारी आमदार प्रताप सरनाईक यांनी एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांसह या उड्डाणपुलाला भेट देऊन संबंधित अधिकाऱ्यांना महत्त्वाच्या सूचना दिल्या. यावेळी एमएमआरडीएचे कार्यकारी अभियंता योजना पाटील, जे कुमार इन्फ्रा प्रकल्प व्यवस्थापक सुब्रतोदास अधिकारी व महापालिकेचे अधिकारी उपस्थित होते.
उड्डाणपुलाचे काम जवळपास पूर्ण झाले असले तरी पावसामुळे काही किरकोळ कामे बाकी आहेत. डिव्हायडर, रिफ्लेक्टर, रंगरंगोटी अशी सर्व कामे येत्या आठवडाभरात पूर्ण करा, अशा सूचना आमदार सरनाईक यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.मेट्रो 9 मार्गाचे काम सुरू आहे. या मेट्रोचे काम सुरू झाल्यावर भविष्य डोळ्यासमोर ठेवून या मार्गावर दुहेरी मार्ग, वर मेट्रो आणि खाली जंक्शनवर उड्डाणपूल या संकल्पनेतून या मार्गावर तीन उड्डाणपूल मंजूर करण्यात आले. एमएमआरडीएच्या तत्कालीन अतिरिक्त महानगर आयुक्त सोनिया सेठी यांनी सरनाईक यांच्यासोबत जानेवारी २०२० मध्ये भेट दिली होती. त्यानंतर 3 पुलांसाठी 217 कोटी रुपयांचे अंदाजपत्रक मंजूर करण्यात आले.
प्लेझंट पार्क सिग्नल ते सिल्व्हर पार्क सिग्नलपर्यंतचा उड्डाणपूल जवळपास पूर्ण झाला आहे. हा पूल सुमारे एक किलोमीटर लांबीचा आहे. त्याची रुंदी अंदाजे 17.5 मीटर आहे. तर रॅम्पची रुंदी 19.5 मीटर आहे. या उड्डाणपुलाचे ९८ टक्के काम पूर्ण झाले असून येथे लाल रंगाची थीम निश्चित करण्यात आली आहे. या उड्डाणपुलावर अंदाजे 75 कोटी रुपये खर्च झाले आहेत. या उड्डाणपुलाने दोन मोठे जंक्शन व्यापले आहेत, अशी माहिती आमदार सरनाईक यांनी दिली.
मुंबई महानगरातील हा पहिलाच मेट्रो इंटिग्रेटेड फ्लायओव्हर आहे. वर मेट्रो, खाली उड्डाणपूल आणि त्याखालील सध्याचा रस्ता अशा सुविधा उपलब्ध असतील. येथे सर्वप्रथम मेट्रो मार्गाचे काम पूर्ण झाले. त्यानंतर या डबलडेकर उड्डाणपुलाचे काम सुरू करण्यात आले. सुमारे दीड वर्षात उड्डाणपुलाचे काम पूर्ण झाले, अशी माहिती अधिकाऱ्यांनी आमदार सरनाईक यांना दिली. या मार्गावरील तीनपैकी एका उड्डाणपुलाचे काम पूर्ण झाले आहे. तर दुसऱ्या उड्डाणपुलाचे काम दिवाळीपूर्वी पूर्ण होईल, असे आश्वासन अधिकाऱ्यांनी आमदार सरनाईक यांना दिले. उड्डाणपुलाचे उर्वरित सर्व काम येत्या आठवडाभरात पूर्ण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मेट्रो आणि उड्डाणपुलाचे काम एमएमआरडीएकडून केले जात आहे.