सुन्नी मुस्लिम जमातीच्या आमरण उपोषणाची सांगता

वासिंद,दि.१५(वार्ताहर)-सुन्नी मुस्लिम जमातीच्या वतीने शहापूर तहसिलदारांना ४ ङ्गेब्रुवारी रोजी एक निवेदन देऊन तबलिग जमातीचा इज्तेमा (सत्संग) वासिंदमध्ये आयोजित केला गेल्यास वाद
होण्याची शक्यता आहे. यामुळे जातीय सलोखा धोक्यात येऊ शकतो व गावाची शांतता भंग होऊ शकते, याचा ठराव ग्रामसभेत झाला होता. तसेच याबाबत शासनाला लेखी आश्‍वासन मिळत नसल्याने आमरण उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला होता, मात्र दिलेल्या निवेदनावर शासनाचे कोणतेही लेखी स्वरूपात ठोस आश्‍वासन न मिळाल्यामुळे बुधवारपासून सुन्नी मुस्लिम जमात यांच्या वतीने येथील ग्रामपंचायत कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्यात आले होते. रविवारी पाचव्या दिवशी उपोषणकर्त्यांनी कार्यक्रम न होण्याबाबत शासन, प्रशासन मागणी मान्य करीत नसल्याचा जाहीर निषेध व्यक्त करीत उपोषण दुपारी १.३० च्या सुमारास बंद केले. थबलिग जमातीचा इज्तेमा (सत्संग) कार्यक्रम वासिंदमध्ये हायवेलगत ज्या जागेत होणार आहे त्या खाजगी जागा मालकाने इज्तेमा कार्यक्रमाला पुन्हा परवानगी दिली. त्यामुळे शासन, प्रशासनाने सहकार्य केले नाही व राजकीय पक्षांनी आपली भूमिका बदलल्याने व आमची मागणी मान्य न केल्याने व्यासपीठावरून जाहीर निषेध करीत उपोषणकर्त्यांनी उपोषण समाप्त केले. या आमरण उपोषणाला पाठिंबा म्हणून वासिंद शहरामध्ये शनिवारी कडकडीत बंद पाळण्यात आला होता. वासिंद बाजारपेठ १०० टक्के बंद होती. यामध्ये रिक्षाचालक-मालक संघटना, निमीडोअर चालक-मालक संघटना यांनी आपल्या रिक्षा बंद ठेवून बंदमध्ये सहभाग घेतला होता. दरम्यान, याबाबत तबलिग जमातीच्या शहापूर मशीद (ट्रस्ट)ने दिलेल्या प्रसिद्धीपत्रकामध्ये असे स्पष्टीकरण दिले होते की, वासिंद येथील नियोजित इज्तेमा (मुस्लिम धार्मिक प्रबोधन) समारंभाबाबत पसरवल्या जाणार्‍या अङ्गवा व गैरसमजासंदर्भात झालेल्या एका बैठकीत इज्तेमा आयोजकांनी स्पष्टीकरण केल्याने शिवसेना, भाजपा, राष्ट्रवादी, कॉंग्रेस, मनसे, आरपीआय, वासिंद सरपंच आदी राजकीय पक्षांचे बैठकीत उपस्थित पदाधिकार्‍यांनी समाजजागृतीच्या इज्तेमा समारंभाला जाहीर पाठिंबा दर्शविला व एकमुखी समर्थन दिले. तसेच इज्तेमा समारंभविरोधातील अङ्गवा प्रतिबंधासाठी प्रशासन यंत्रणेने तत्काळ उपाययोजना करण्याचे आवाहन सर्वपक्षीय पदाधिकार्‍यांनी व्यक्त केले होते. विनामोबदला सामुदायिक विवाह योजना, व्यसनमुक्ती, अंधश्रध्दानिर्मूलन, समाजशिक्षण व पुरोगामी विचारांचा धार्मिक प्रसार या इज्तेमा समारंभाद्वारे केले जातात. तालुका व जिल्हा सुन्नी जमाते कमिटीचेही समर्थन मिळाले असून स्थानिक मुस्लिमबांधवांनी सक्रिय सहभाग घेत इज्तेमा व्यवस्थापनाची जबाबदारी स्वीकारली आहे. वासिंद येथील या इज्तेमा समारंभाबाबत गैरसमज पसरवणार्‍या अपप्रवृत्तींविरोधात प्रशासन यंत्रणेने तत्काळ उपाययोजना करण्याचे आवाहनदेखील सर्वपक्षीय पदाधिकार्‍यांनी बैठकीत करून पाठिंबापत्रेही प्रशासनाला देण्यात आली होती. दरम्यान, गेल्या महिन्याभरापासून सुरू असलेल्या या प्रकरणाने वासिंद शहर चांगलेच ढवळून निघाले होते. तर उपोषणकर्ते, सुन्नी मुस्लिम जमात, तबलिग जमात, नागरिक, प्रशासन, पोलिस कोणती भुमिका घेणार आहेत? याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. आता उपोषणकर्त्यांनी आपले आमरण उपोषण मागे घेतल्याने या सर्व गोष्टींना पूर्णविराम मिळाला आहे.

वाशिंद