शहापूर तालुका गावठी दारूमुक्तीच्या दिशेने; देशी दारूविक्रीत मात्र ५० टक्क्यांनी वाढ

खर्डी,दि.२४(वार्ताहर)-ठाणे ग्रामीण पोलीस अधिक्षक डॉ. महेश पाटील यांनी ठाणे जिल्हा गावठी दारूमुक्त करण्याचा उपक्रम गेल्या दोन महिन्यांपासून सुरू केला आहे. या उपक्रमांतर्गत शहापूर तालुक्यातील उपविभागीय अधिकारी विशाल ठाकूर यांच्या मार्गदर्शनात पोलिसांनी धडक कारवाई करीत परिसरातील जंगलातील अनेक गावठी दारूचे अड्डे उद्ध्वस्त केले असून तालुका ९९ टक्के गावठीमुक्त झाला आहे. तालुक्यात एकूण १५६१ लीटर गावठी दारू, १९८५० लीटर दारूमिश्रित वॉश यांची अंदाजे एकूण किंमत ३,२५,८५५ रुपये असून ३५० च्या वर आरोपींवर कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत पकडलेल्या आरोपींना व स्वतःहून धंदे बंद करणार्‍या कुटुंबातील अनेकांना रोजगार उपलब्ध करून दिले असल्याचे शाहपूरचे पोलीस निरीक्षक संजय धुमाळ यांनी सांगितले. शहापूर तालुक्यातील वासिद, शहापूर, कसारा व किन्हवली या चार पोलीस ठाण्यांच्या हद्दीत गेल्या ४० वर्षांपासून गावठी दारू भट्ट्यांचा सुळसुळाट होता, परंतु तालुक्यातील सर्वच पोलीस ठाण्यातील वरिष्ठ अधिकार्‍यांनी पोलीस निरीक्षक पाटील यांच्या आदेशाची अमलबजावणी सुरू केली असून गावठी दारू उत्पादन करणार्‍या व विक्री करणार्‍यांविरोधात जोरदार मोहीम सुरू केली असून गेल्या दोन महिन्यांत शहापूर पोलीस ठाण्यात ९६३० लिटर गूळमिश्रित वॉश, ७१४ लीटर गावठी दारू यांची अंदाजे २ लाख ४ हजार ८५५ रुपयांची दारू जप्त केली असून १५० केसेस दाखल करून ४५ आरोपींना अटक केली आहे. त्यात सरलांबे, आवरे, खुटघर, खर्डी, सापगाव, कळबे यासारख्या अनेक गावांत, खेड्यापाड्यांवर जावून कारवाई केली. कसारा पोलीस हद्दीत ४६ केसेस करून ३५ आरोपींना अटक करण्यात आली व ४५० लीटर गावठी दारू तसेच ७२५०० लीटर वॉश जप्त करण्यात आला असून त्याची अंदाजे किंमत ७५ हजार रुपये आहे. तर किन्हवली पोलीस ठाण्यात ४५ केसेस करण्यात आल्या असून ४४ आरोपींना अटक करण्यात आले असून २९७ लीटर गावठी दारू व २१९० लीटर वॉश जप्त करण्यात आला असून त्याची अंदाजे किंमत ३६३५४ रुपये आहे, त्यामुळे ग्रामीण भागातील दारू बनविणारे, विक्री करणारे यांचे धाबे दणाणले आहेत. गेल्या दोन महिन्यांपासून अवैध गावठी दारूविरोधात शहापूर तालुक्यातील पोलिसांनी जोरदार मोहीम हाती घेऊन प्रत्येक गावात दारूबंदीस सहकार्य करण्यासाठी समित्या स्थापन केल्या असून त्यात महिलांनाचाही समावेश असल्याने खेड्यापाड्यांत ९९ टक्के दारू बंद झाल्याने महिला समाधान व्यक्त करीत आहेत. कारवाईदरम्यान पकडलेले आरोपी पुन्हा त्या धंद्याकडे वळण्याची शक्यता असल्याने त्यांच्या हाताला काम मिळून त्यांचे पूनर्वसन व्हावे यासाठी पोलीस अधिकारी झटत आहेत. या उपक्रमांतर्गत पकडलेल्या काही महिला आरोपींना स्वयंपाक व शेतातील भाजीपाला विक्री करण्याचे कामे उपलब्ध करुन दिलीत व पुरुषांना सुरक्षारक्षक, दुकानात काम यासारख्या ठिकाणी त्यांना कामे उपलब्ध करून उदरनिर्वाहाचे साधन उपलब्ध करून दिले आहे. शाहपूरचे पोलीस निरीक्षक संजय धुमाळ, कसारा पोलीस निरीक्षक प्रदीप कसबे, किन्हवलीचे पोलीस निरीक्षक सचिन सस्ते, वासिंदचे पोलीस निरीक्षक आनिल पवार व खर्डीचे पोलीस उपनिरीक्षक डी. एस. खोकराळे यांनी विशेष प्रयत्न करून गावठी दारूबंदी अभियान राबवून तालुका गावठी दारूमुक्त केला आहे. गेल्या काही वर्षांत या तालुक्यात धरणाच्या पात्रात, जंगलात मोठ्या प्रमाणात गावठी दारू बनविणार्‍या भट्ट्या बिनदीक्कत सुरू होत्या, परंतु पोलिसांनी दारू भट्टया उद्ध्वस्त करून पायालाच हात घातल्याने महिलावर्ग समाधान व्यक्त करीत आहे. तालुक्यात ‘गावठी दारूबंदी’ला उत्तम प्रतिसाद मिळाला असून गावठी दारू बंद झाल्याने सरकारमान्य देशी दारूच्या धंद्यात ५० टक्के वाढ झाली असल्याचे येथील मालकांकडून्स मजत आहे, त्यामुळे सरकारच्या तिजोरीत महसुलाची वाढ झाली आहे. ठाणे जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश पाटील यांच्या आदेशाने शहापूर तालुका गावठी दारूमुक्त करण्यासाठी धडक कारवाई सुरू असून तालुक्यात १०० टक्के गावठी दारूमुक्त झाली आहे. पकडलेल्या आरोपींचे पूनर्वसन करण्यासाठी त्यांना झेपेल असे काम उपलब्ध करून त्यांचा रोजीरोटीचा प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करीत आहोत, असे संजय धुमाळ, पोलीस निरीक्षक, शहापूर यांनी सांगितले.

खर्डी