शहापूरच्या आदिवासींचा घसा कोरडाच

आसनगांव,दि.१८-मुंबईसह, ठाणे, कल्याण उपनगरांची तहान भागविणार्‍या शहापूर तालुक्याची पाणीटंचाईतून काही मुक्तता होताना दिसत नाही. भातसा, तानसा, वैतरणा, मध्य वैतरणासारख्या महाकाय जलाशयांची जलसंपत्तीचा ठेवा उशाशी असतानाही या जलाशयांतून येथील आदिवासींना थेंबभर पाण्यासाठी पायवाट काढत डोंगर-दर्‍यांचा सामना करीत रानोवनी अनवाणी ङ्गिरावे लागत आहे. शेकडो गाव-पाड्यांची दरवर्षीची पाणीटंचाई आदिवासींकरिता जणू वेळापत्रकच बनलेले असल्याने टंचाईनिवारणासाठी प्रशासनाकडून करोडोंचा चुराडा होऊनही वर्षानुवर्षे टंचाईग्रस्त असलेल्या आदिवासींची पाण्यासाठीची होरपळ जैसी थे असल्याचे वास्तव शहापूर तालुक्याच्या अतिदुर्गम आदिवासी ग्रामीण भागात आजही दिसून येत आहे. धरणांच्या तालुक्यातील हे भयाण वास्तव काळजाची थरकाप करणारे असून प्रशासनाच्या उदासीन तथा खाऊगिरीमुळे आदिवासींना मात्र घोटभर पाण्याअभावी तहानलेल्या घशाची कोरड शमविण्याकरिता तळपत्या उन्हात मैलोनमैल पायपीट करावी लागत आहे. ठाणे जिल्ह्याच्या पटलावरील एकमेव आदिवासी तालुका असलेल्या शहापूरची ओळख ही कागदावर धरणांचा तालुका म्हणून ओळखला जातो. निसर्गसौंदर्याने नटलेल्या शहापुरात भातसा, तानसा, वैतरणा, मध्य वैतरणासारख्या जलाशयांचा ठेवा असल्याने देशाच्या आर्थिक राजधानीची तहान भागविण्याचे काम याच तालुक्याला करावे लागते आहे. पाण्यासारखे पुण्य ङ्गक्त शहापूरच करू शकते याची कबुलीही करोडो मुंबईकर स्वप्नातही देतील, परंतु शापित शहापुरकरांच्या पापणीचे अश्रू आजतागायत ना मुंबई, ठाणे महापालिका पुसू शकली, ना राज्य सरकारचे राज्यकर्ते. शहापूरच्या आदिवासींच्या माथी टंचाईचे संकट कायमच असून तालुक्यातील कसारा, किन्हवली, डोळखांब, खर्डी परिसराचा यात समावेश असून विहिरीही कोरड्या खाक पडल्या आहेत कुपनलिकांनी तळ गाठला असून नदी नाले किनारच्या कोरड्या पात्रातील डवरेही आटलेले आहेत. दरम्यान, टंचाई निवारण्याकरिता नियोजनाचा पुरता बोजवारा असलेल्या ढिम्म प्रशासनाकडून केवळ योजना राबवून, टँकरने पाणीपुरवठा करून तहान शमविण्याचा दिखावा होताना दिसत आहे, परंतु करोडोंचा खर्च करूनही टंचाईची पंचाईत ओढावल्याशिवाय राहत नाही हे विदारक चित्र आता नेहमीचेच बनले आहे. दरम्यान, तालुक्यात सन २००८ पासून मंजूर असलेल्या १९३ नळ पाणीपुरवठा योजनांपैकी बहुतांश योजना भ्रष्टाचाच्या विळख्यात अडकलेल्या असल्याने आजही पूर्णत्वास आलेल्या नाहीत. दरवर्षी करोडो रुपयांचा निधी टंचाईग्रस्त गाव पाड्यांकरिता खर्ची होत असतो, परंतु येथील टंचाईसदृश्य परिस्थिती कायमची शमविण्यात प्रशासनाला अद्यापि यश आलेले नाही. तालुक्यातील पाणीटंचाई निवारण्यासाठी पंचायत समिती, महसूल प्रशासन व पाणीपुरवठा उपविभागाकडून टंचाईग्रस्त ७६ गावे २६६ पाड्यांकरिता संभाव्य कृतिआराखडा प्रस्तावित करण्यात आला. यात ५ ठिकाणी बुडक्या घेणे, ८ पाड्यांतील विहिरी खोल करून गाळ काढणे, ४० गावे व १२० पाड्यांना बैलगाडीसह टँकरने पाणीपुरवठा करणे, प्रगतिपथावरील २६ नळ पाणीपुरवठा योजना पूर्ण करणे, ४ पाड्यांतील विंधन विहिरीचे काम करणे असा एकूण ४ कोटी ७५ लाखांचा कृतिआराखडा जिल्हाधिकारी कार्यालयाकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आला, परंतु प्रशासनाच्या उदासीनपणामुळे बासनात गुंडाळून ठेवलेला सदरचा आराखडा मंजूर होण्याकरिता येथील टंचाईने त्रस्त असलेल्या आदिवासींना एप्रिलपर्यंतची वाट बघावी लागली असून केवळ कसारा परिसरातील दांड, पारधवाडी, ओहळाचीवाडी, साबरवाडी, नारळवाडी, चिंतामणवाडी व नवीनवाडी आदी १ गाव व ७ पाड्यांना गेल्या दोन दिवसांपासून टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. दरम्यान, धरण उशाला असतानाही घोटभर पिण्याकरिता पाणी मिळू शकत नसल्याने आदिवासी महिला लेकरा-बाळांसहीत पाण्याच्या एक एक थेंबासाठी तळपत्या उन्हात पाण्यासाठी कोसो दूर पायपीट करतानाचे वास्तव आहे तर घशाची कोरड भागविण्याकरिता अनेक निष्पाप आदिवासींना आपले प्राण गमवावे लागले असून कसारा परिसरातील तुकाराम आगिवले नुकताच पाणीटंचाईचा बळी ठरला आहे. मागील दोन वर्षांपूर्वीही १४ वर्षीय सविता पुराणे व १३ वर्षीय मनिषा वारे यांना पाण्यासाठी जीव गमवावा लागल्याच्या घटना वारंवार घडत असतानादेखील सरकार आणखी किती आदिवासींचे बळी घेणार आहे, हा प्रश्न टंचाईग्रस्त आदिवासींच्या समोर उभा ठाकला आहे. दरम्यान, इगतपुरी तालुक्यातून शहापुरकरिता गुरुत्वाकर्षण आधारित भावली योजनेकरिता सरकारने पाणी आरक्षित केले खरी, परंतु शहापुरकरांना भावली भावण्यास किमान दोन वर्षांहून अधिकचा काळ वाट पाहावी लागणार आहे. परिणामी सद्यस्थितील पाणीटंचाई धरणे उशाला असूनही घशाची कोरड मात्र भागवू शकत नाही. हे भूत टंचाईने त्रस्त असलेल्या आदिवासींच्या मनगुटीवरून खाली उतरताना तरी दिसत नाही.

आसनगाव