वासिंदमध्ये डीजे, डॉल्बी वाजविण्यावर पूर्णतः बंदी

वासिंद,दि.२३(वार्ताहर)-उच्च न्यायालयाने गणेशोत्सवात डीजे व डॉल्बी वाजविण्यावर बंदी घातलेली असून वासिंदमधील मंडळांनीसुद्धा न्यायालयाच्या आदेशाचे पालन करण्याचे आवाहन शहापूर उपविभागीय अधिकारी विशाल ठाकूर यांनी केले. ग्रामपंचायत हॉलमध्ये परिसरातील गणेशोत्सव मंडळांचे अध्यक्ष, सदस्य, राजकीय पदाधिकारी व नागरिकांसमवेत एका बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. उत्सवाच्या नावावर जनसामान्य जनतेला होणारा त्रास या विरोधात उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली होती. त्याच अनुषंगाने न्यायालयाने सणांमध्ये काही निर्बंध लादले. त्यांची अंमलबजावणी होण्याच्या दृष्टीने महत्त्वाची जबाबदारी पोलीस प्रशासनाची आहे. मागिल वर्षी गणेशोत्सव व नवरात्रोत्सवात ज्या मंडळानी डीजे लावून ध्वनीप्रदूषण करण्याचा प्रयत्न केला त्या मंडळांच्या अध्यक्षांसह पदाधिकार्‍यांना समन्स काढण्यात येणार आहेत. त्यांच्यावर उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार पाच लाख रुपये दंड व अटक होण्याची शक्यता आहे. या वर्षीसुद्धा नियमांचे काटेकोर पालन न करणार्‍या मंडळांवर पोलिसांशी असलेले हितसंबंध व राजकीय पुढारी यांच्या दबावाला बळी न पडता पर्यावरण नियंत्रण कायदा व ध्वनिप्रदूषण नियमावली २००० अन्वये कठोर कारवाई केली जाणार असून डीजे, वाद्यसामुग्री जप्त केली जाणार असल्याचे ठाकूर यांनी स्पष्ट केले. डीजे लावणार्‍या मंडळांवर कारवाई करीत दुसर्‍या दिवशी डीजे जप्त केले जातील. पारंपरिक पद्धतीने सण साजरे करण्यावर मंडळांनी भर देवून पारंपरिक वाद्यांचा वापर करावा. ६५ डेसिबलपेक्षा जास्त आवाज होणारे ङ्गटाके वाजवू नयेत. तसेच दहा ते बारा वाजेच्या आत गणेश विसर्जन होईल यासाठी मंडळांनी पुढाकार घ्यावा जेणेकरून वाहतूककोंडी होणार नाही, असेही आवाहन यावेळी करण्यात आले. दरवर्षी गणेश विसर्जनावेळी नदी पात्रात निर्माल्य ङ्गेकल्याने मोठ्या प्रमाणात जलप्रदूषण होत असल्याचा मुद्दा शशिकांत शेलार यांनी उपस्थित केला असता यावर नागरिकांनीच दक्षता घेण्याची आवश्यकता असल्याचे सरपंच राजेंद्र म्हसकर यांनी सांगितले तर एक सेवाभावी संस्था नदीपात्रातील निर्माल्य एकत्र करून त्याची विल्हेवाट लावणार असल्याचे राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संदीप पाटील यांनी सांगितले. यावेळी पोलीस उपनिरीक्षक दीप्ति मिठारी व अजय शेटे यांनी उपस्थितांशी संवाद साधत मंडळांना परवानगी अर्ज भरण्याचे आवाहन केले. सण साजरे करण्यास आमचा विरोध नाही. उच्च न्यायालयाच्या नियमांचे पालन होणे गरजेचे आहे. यावर्षी वासिंदमध्ये झालेल्या मुस्लिम बांधवांच्या इस्तिमाविरोधात ध्वनीप्रदूषण केल्याबाबतसुद्धा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळाचीदेखील वासिंदवर करडी नजर असेल, असे विशाल ठाकूर, पोलीस उपविभागीय अधिकारी, शहापूर यांनी सांगितले. जलप्रदूषण होऊ नये यासाठी ग्रामपंचायत प्रयत्नशील असून गणेशघाटाजवळ सङ्गाई कर्मचारी नेमणूक करण्यात येईल, असे राजेंद्र म्हसकर, सरपंच, ग्रामपंचायत वासिंद यांनी सांगितले.

वाशिंद