मुरबाड तालुक्यातील १४ शौचालये वनखात्याने केली भुईसपाट

सरळगांव,दि.११(वार्ताहर)-केंद्र सरकारच्या महात्त्वाकांक्षी प्रकल्पांपैकी असलेल्या भारत स्वछता अभियानांतर्गत मुरबाड तालुक्यातील १४ शौचयालये वनखात्याने कोणतीही पूर्वसूचना न देता भुईसपाट करीत शासनाचे लाखो रुपयांचे नुकसान केल्याने नागरिकांमधे संतापाचे वातावरण निर्माण झालेले आहे. स्वच्छ भारत मिशन योजनेंतर्गत मुरबाड तालुक्यातील नांदेणी गावात बांधण्यात आलेल्या चौदा शौचालयांवर वन खात्याने आपली जागा निश्‍चित न करता व ग्रामपंचायत तसेच लाभार्थ्यांना कोणतीही पूर्वसूचना न देता बुल्डोजर ङ्गिरवून ती जमीनदोस्त केली आहेत. स्वच्छ भारत मिशन योजनेंतर्गत सन २०१५ ते २०१६ या काळात शौचालय मंजूर होऊन गावाशेजारी असलेल्या सार्वजनिक जागेवर बांधण्यात आलेल्या १४ शौचालयांचा एक ते दीड वर्षापासून वापर सुरू होता. सार्वजनिक बांधलेल्या शौचालयालगतच वनखात्याची जागा आहे, परंतु आपल्या जागेची हद्द निश्चित न करता तसेच ग्रामपंचायतीला कोणतीही नोटीस वा पूर्वसूचना न देता वनखात्याने ही शौचालये तोडली. याबाबत शासनाच्या निधीतून बांधण्यात आलेल्या १ लाख ६८ हजारांचे नुकसान झाले असून गावचे सरपंच श्रीकांत धुमाळ यांनी वनखात्याच्या अधिकार्‍यांवर कठोर कारवाईची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली तोडण्यात आलेल्या शौचालयांमुळे आता गावकर्‍यांवर उघड्यावर शौचालयाला जाण्याची वेळ आली आहे. एकीकडे केंद्र सरकार संपूर्ण भारत स्वच्छ व १०० टक्के हागणदारीमुक्त करण्यासाठी अनेक योजना राबवित आहे. तर दुसरीकडे हे अधिकारी कोणतीही पडताळणी न करता बांधण्यात आलेले शौचालय तोडून शासनाच्या निधीचे नुकसान करीत आहेत. अशा अधिकार्‍यांवर कारवाई होणार का, तसेच शौचालयाचे नुकसान केलेल्या लाभार्थ्यांना त्यांची भरपाई मिळेल का, याकडे आता गावकर्‍यांचे लक्ष लागले.

सरलगाव