भिवंडी पंचायत समिती कर्मचारी निवासस्थानाची दुरवस्था

अनगांव,दि.२३(वार्ताहर)-शहरातील गैबीनगर येथे असलेल्या भिवंडी पंचायत समिती कर्मचारी निवासस्थानाच्या इमारतीची पूर्णतः दुरवस्था झाली आहे. या मोडकळीस आलेल्या इमारतीचं दरवाजे, खिडक्या वासे चोरट्यांनी चोरून नेले आहेत. गेल्या पंधरा वर्षांपासून या इमारतीची दुरवस्था झाल्याने त्याकडे बांधकाम विभागाचे अधिकारी दुर्लक्ष करीत आहेत. कर्मचार्‍यांची गैरसोय होत असून तक्रारी करूनही नव्याने इमारतीचं बांधकाम करण्यात येत नसल्याने कर्मचारीही हतबळ झाले आहेत, त्यामुळे त्यांना भाडोत्री खोल्यांमध्ये राहण्याची वेळ आली आहे. ठाणे जिल्हा परिषद आणि भिवंडी पंचायत समिती बांधकाम विभागाच्या अखत्यारित येणार्‍या या कर्मचारी निवासस्थान इमारतीची गेल्या पंधरा वर्षांपासून दुरवस्था झाली आहे. या इमारतीमध्ये कर्मचार्‍यांकरिता १५ खोल्या आहेत. हे कर्मचारी आपल्या कुटुंबासह येथे राहत होते. १९६५ साली या खोल्यांचे बांधकाम केले आहे. कर्मचारी वास्तव्यास होते तेव्हापासून या इमारतीची दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी कर्मचारी करीत होते त्याकडे पंचायत समिती बांधकाम विभागाच्या अधिकार्‍यांनी दुर्लक्ष केल्याने कुठलाही अनर्थ घडू नये व राहण्यास धोकादायक असल्याने कर्मचारी नाईलाजास्तव इतरत्र ठिकाणी भाड्याचे खोल्या घेऊन राहू लागले. याच ठिकाणी एकात्मिक बालविकास सेवा योजनेचे व अभय केंद्र संरक्षण अधिकारी व सर्व शिक्षा अभियानाचं कार्यालय आहे. या कार्यालयांच्या दोन्ही बाजूला कर्मचारी इमारती आहेत. सुरक्षारक्षक नसल्याने कर्मचारी राहत नसल्याने या इमारतीच्या खोल्याचे दरवाजे, खिडक्या वासे कौले हे नागरिकांनी चोरुन नेले आहेत. गेली पंधरा वर्षांपासून मागणी करुनही बांधकाम विभागाचे अधिकारी याकडे दुर्लक्ष करीत आहेत, असा प्रश्‍न कर्मचारी विचारत आहेत. कर्मचार्‍यांच्या निवासस्थानांची देखभाल दुरुस्ती जर होत नसेल तर तालुक्यातील शाला, पशुवैद्यकीय अंगणवाड्या, आरोग्य दवाखान्यांची अवस्था काय असेल हे यावरुन स्पष्ट दिसतेय अशी प्रतिक्रिया कर्मचारी व्यक्त करीत आहेत. दुरवस्था झालेल्या इमारती पाडून त्या ठिकाणी नव्याने इमारतीचं बांधकाम करुन कर्मचार्‍यांची होणारी गैरसोय दूर करावी, अशी मागणी कर्मचारी करीत आहेत. विशेष म्हणजे एवढे वर्ष होऊनही या गोष्टीकडे का दुर्लक्ष केले जात आहे. जिल्हा परिषद व पंचायत समित्या बरखास्त झाल्याने प्रशासन तर अधिकारीच चालवितात, असे असतानाही ही कामे प्रलंबित राहतात हे एक न उलगडणारे कोडे आहे. ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता याकडे लक्ष देतील काय असा प्रश्‍न कर्मचार्‍यांसह सर्व सामान्य नागरिक विचारत आहेत. कर्मचारी निवासस्थानाच्या इमारतीची दुरवस्था झाली आहे ही वस्तुस्थिती खरी आहे. कर्मचार्‍यांची गैरसोय होते आहे हे खरे आहे. इमारतीच नव्याने बांधकाम करण्यासंबंधी प्रस्ताव तयार करून वरिष्ठांना पाठविणार आहे, असे डी.एम.गीते उपअभियंता, बांधकाम विभाग पं.स.भिवंडी म्हणाले तर निवासस्थानाची दुरावस्था झाल्याने कर्मचार्‍यांची गैरसोय होत असून ती दूर करण्यात यावी, असे एस.एल.जाधव याने सांगितले.

अनगाव