भातसा उजवा कालव्यावरील लोखंडी पूल तुटला

शेंद्रूण,दि.१५(वार्ताहर)-शहापूर तालुक्यातील भातसा उजवा कालव्यावरील साजिवली गावानजीकचा लोखंडी पूल तुटून पडला आहे. गेल्या ३० वर्षांपूर्वीचा जुना असलेला पूल क्र. ०३ दूरवस्थेमुळे रविवारी सायंकाळी ६ च्या सुमारास अचानक तुटुन पडल्याने साजिवली (भोईरवाडी) येथील ५ घरांची लोकवस्ती असलेल्या नागरिकांचा तालुक्याशी संपर्क तुटला आहे. दरम्यान, भातसा उजवा कालव्याच्या पाण्यावर अवलंबून बारमाही शेती करणार्‍या साजिवली (भोईरवाडी) गावातील २० ते २५ शेतकर्‍यांचा कालव्यापलीकडे असलेल्या शेतीशीही संपर्क तुटल्याने ऐन रब्बीचा हंगाम जवळ येत असल्याने शेतीच्या उपजीविकेवर अवलंबून असणारा शेतकरीवर्ग हतबल झाला आहे. या पुलाची गेल्या काही वर्षांपासून दुरवस्था झाली होती. याबाबत नागरिकांनी संबंधीत विभागाला पुलाची दुरुस्ती करण्यासाठी अनेकवेळा कळवूनही भातसा उजवा कालवा विभागाने सातत्याने दुर्लक्ष केल्याने पूल तुटुन पडल्याने येथील नागरिकांची गैरसोय झाली आहे. भातसा उजवा कालव्यावरील लोखंडी पुलाची अनेक वर्षांपासून दुरवस्था झाली होती. याबाबत संबंधित विभागाला दुरुस्ती करण्यासाठी अनेकवेळा कळविणेत आले होते, परंतु पुल दुरुस्तीकडे सातत्याने दुर्लक्ष केल्याने हा पूल तुटल्याने भोईरवाडीतील नागरिकांची गैरसोय झाली आहे. भातसा उजवा कालवा विभागाने या पुलाची तात्काळ दुरुस्ती करून शेतकर्‍यांची गैरसोय सोडवावी, असे साजिवलीचे कुमार भोईर यांनी सांगितले.

शेंद्रुण