फांगणे गावात भरली आजीबाईंची शाळा

सरळगाव,दि.१९(वार्ताहर)-शिक्षणाला वयाची काही मर्यादा नसते जेव्हा साठ ते नव्वद वयाच्या महिला शाळेत शिक्षण घेतायेत असं जर तुम्ही ऐकलं तर तुम्हाला नवलच वाटेल, पण हे खरं आहे. मुरबाडच्या ङ्गांगणे गावाने हे करून दाखवलयं लहानपणी शिक्षणापासून वंचित असलेल्या साठ ते नव्वद वयाच्या आजीबाईंसाठी आजीबाईची शाळा सुरू झाली आहे. मुरबाड तालुक्यातील फांगणे गावात मार्च २०१५ मध्ये जि.प.शाळेमधील शिक्षक योगेंद्र बांगर यांनी शिवजयंतीच्या दिवशी शंभर महिलांकडून शिवचरित्र वाचण्याचा कार्यक्रम आयोजीत केला होता, मात्र त्यातील २८ ते ३० महिलांना शिक्षणाअभावी शिवचरित्र वाचता न आल्याने त्या महिलांनी खंत व्यक्त केली अणि त्यानंतर योगेंद्र बांगर यांनी त्यांच्या संकल्पनेतून आजीबाईंची शाळा सुरू केली. या आजीबाईंच्या शाळेत सध्या तीस महिला शिक्षण घेत आहेत. शाळेचं वैशिष्ट्य म्हणजे ज्याप्रमाणे शाळेतले विद्यार्थी गणवेशात शाळेत जातात त्याचप्रमाणे या महिलादेखील एकाच रंगाचे कपडे व दप्तर घेऊन शाळेत येत असतात. ज्यांना अक्षराची ओळखसुद्धा नव्हती अशा महिला आता बर्‍यापैकी लिहायला वाचायला शिकल्या आहेत. आज या आजीबाईच्या शाळेत प्रतेक महिलेच्या नावाने एक झाड लावण्यात आले आहे व त्या झाडांची देखभालदेखील त्याच करतात. या महिलांना शिकवण्याचे काम गावातील महिला शितल मोरे या करतात. योगेंद्र बांगर यांच्या संकल्पनेतून फांगणे गावात सुरू असलेल्या या आजीबाईंच्या शाळेचं सर्वत्र कौतुक होत असून या आजीबाईच्या शाळेला भेट देण्यासाठी अनेक राज्यांतून, विदेशांतून लोकं येत असतात.

सरलगाव