प्रियकराच्या मदतीने पतीचा काढला काटा, मृतदेह फेकला नदीत

आसनगांव,दि.२६(वार्ताहर)-प्रेम संबंधात अडचण ठरणार्‍या पतीची प्रियकर आणि त्याच्या साथीदारांच्या मदतीने पत्नीनेच हत्या केली. ही घटना शहापूर तालुक्यातील डिंभे गावात घडली. या प्रकरणी पतीची हत्या करणार्‍या पत्नीसह पाच जणांना शहापूर पोलिसांनी अटक केली आहे. दिपीका आमले, तिचा प्रियकर प्रसाद आणि त्याचे साथिदार शब्बीर उर्फ बाळा अहमद शेख (तलवाडा, वाशाळा), हेमंत शिवाजी राऊत (गोठेघर) आणि तुषार शाम अधिकारी (वाफे) अशी आरोपींची नावे आहेत. त्यांना न्यायालयात हजर केले असता त्यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. डिंभे येथील दिपक आमले (३५) हा तरुण २ दिवसांपासून घरातून गेला तो परतलाच नाही. त्यामुळे तो बेपत्ता झाल्याची तक्रार त्याच्या वडिलांनी शहापूर पोलीस ठाण्यात दिली. मात्र गुरुवारी दिपकचा मृतदेह डिंभे गावाजवळील तानसा नदी पात्रात आढळून आला. त्याच्या गळ्यावरील व्रणामुळे त्याची हत्या झाल्याचा संशय दिपकचे वडील आणि नातेवाईकांनी व्यक्त केला. मृत्यदेहाचे शवविच्छेदन केल्यानंतर त्याची गळा आवळून हत्या झाल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर पोलीस निरीक्षक महेश शेट्ये आणि त्यांच्या सहकार्‍यांनी खूनाचा तपास सुरू केला. याबाबत दिपकच्या पत्नीचे बाहेर प्रेमसंबंध असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पत्नीला पोलिसांनी ताब्यात घेऊन पोलिसी खाक्या दाखवताच दिपीकाने गुन्हा केल्याची कबुली दिली. असा रचला हत्येचा कट दोन दिवसांपूर्वी दिपक घरात रात्रीच्या सुमाराला झोपला असताना त्याच्या पत्नीने प्रियकर प्रसाद पंडित संते (गोठेघर) याला फोन करून बोलावून घेतले. तो त्याच्या साथीदारांसह बाईकवर डिंभे येथे आला. त्यानंतर दिपकचा झोपतच दोरीने गळा आवळून त्याची हत्या केली. पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने दिपकचा मृतदेह पुलावरून तानसा नदीत फेकून दिला, अशी माहिती पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाली. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक महेश शेट्ये करीत आहेत.

आसनगाव