नागरिकांसाठी पाण्यात बसून करणार आंदोलन

टिटवाळा,दि.२२(वार्ताहर)-प्रशासनाच्या नाकर्तेपणामुळे पावसाळ्यात लोकांच्या घरात पावसाळ्यात जे पाणी शिरते त्यासाठी पावसाच्या त्या साचलेल्या पाण्यात बसून आंदोलन करण्याचा इशारा नगरसेविका उपेक्षा भोईर प्रभाग क्षेत्र अधिकारी यांना दिलेल्या एका पत्राव्दारे दिला आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे कि, प्रभाग क्र.९ मांडा पूर्व येथील सावरकर चौक ते स्वामी विविकानंद चौक, निमकर नाका परिसर या रस्त्याचे तीन ते चार वर्षांपासून भिजत घोंगडे पडले आहे. या रस्त्याच्या दोन्ही बाजूने चालू असलेले गटाराचे काम हे अर्धवट स्वरुपात असल्याने पाण्याचा निचरा होण्यास अडथळा निर्माण होत आहे. त्यामुळे या भगात पावसाळ्यात संपूर्ण परिसर जलमय होऊन नागरिकांच्या घरात नाल्यातील दुर्गंधीयुक्त पाणी भरते. प्रशासन आणि ठेकेदार यांच्या हलगर्जीपणा यास जबाबदार असून या विषयाबाबत गेली सात वर्षे आपण पाठपुरावा करत असून वारंवार पत्रव्यवहार देखील केलेला आहे. मात्र आजतागायत हा प्रश्न मार्गी लागला नसून या पावसाळ्यात जर तशीच परिस्थिती निर्माण होऊन पाणी साचले आणि नागरीकांना त्रास झाला तर त्याच पाण्यात बसून आपण आंदोलन करणार असल्याचा इशारा नगरसेविका उपेक्षा भोईर यांनी सदर पत्रातून प्रशासनास दिला आहे.

टिटवाळा