दारूबंदीसाठी शिवसेनेचे बेमुदत उपोषण

कसारा,दि.२६(वार्ताहर)-येथील बियर बार, देशी बार, बिअर शॉपी अद्याप बंद न झाल्यामुळे कसारा सेनेच्या वतीने आजपासून (दि २६ जून) बेमुदत उपोषण सुरू करण्यात येत असल्याची माहिती वरिष्ठ नेते चंद्रकांत जाधव यांनी दिली. राष्ट्रीय महामार्ग आणि राज्य मार्गापासून २२० मीटर अंतरापर्यंतचे बार १ एप्रिलपासून बंद करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले असतानाही कसार्‍यातील दारूची दुकाने राजरोस सुरु आहेत, अशा आशयाचे निवेदन राज्य उत्पादन शुल्क अधिकारी, ठाणे यांच्याकडे स्थानिक शिवसेनेच्या वतीने ९ जूनला देण्यात आले होते; यात कारवाई न झाल्यास, १२ जूनपासून बेमुदत उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला होता. मात्र, राज्य उत्पादन शुल्क विभागामार्फत कळविण्यात आले होते की, आम्हास पंधरा दिवसांची मुदत द्या, सखोल चौकशीअंती कारवाई करू. त्यामुळे उपोषण तात्पुरते स्थगित करण्यात आले होते. परंतु आता पंधरा दिवसानंतर सेनेला लेखी कळविण्यात आले आहे की, ज्या मार्गालागत ही दुकाने थाटली गेली आहेत तो जिल्हा मार्ग असल्यामुळे कारवाई करता येत नाही, हे कारण समाधानकारक वाटत नसल्यामुळे शिवसेना आजपासून दारू धंद्यांविरोधात आणि संबंधित अधिका-यांच्या निलंबनाच्या मागणीसाठी कसारा सेनेच्या वतीने बेमुदत उपोषण सुरू होत आहे. ग्रामपंचायत मोखावणे (कसारा) कार्यालयासमोर होणार्‍या या उपोषणामध्ये तालुका पदाधिकारी राजेश सांगळे,स्थानिक सरपंच, उपसरपंच, शाखाप्रमुख विष्णू मुठाळ, व इतरही शिवसैनिक सहभागी होणार आहे.

कसारा