दत्तात्रेय अवताराची डोळ्याचे पारणे फेडणारी आरास

टिटवाळा,दि.२९(वार्ताहर)-टिटवाळयातील रत्नाकर पाटील यांच्या घरगुती गणपतीची सजावट म्हणजेच नयनरम्य डोळ्याचे पारणे फेडणारी अशी आरास हे जणू समीकरणच गेली १८ वर्ष झालेले आहे. मांडा गावातील रत्नाकर पाटील यांचे वडील धर्मा पाटील हयात असताना कल्पकतेने आपल्या घरगुती गणपतीसजावटीत स्वत: वेगवेगळे देखावे साकारायचे. त्यांच्यातला हा कलागुण त्यांचे सुपुत्र रत्नाकर पाटील यांनी आत्मसात करत तोच वारसा पुढे चालू ठेवला आहे. धर्मा पाटील यांनी सन १९९९पासून ही सजावटीची परंपरा चालू केली. सुरुवातीला चलचित्र नव्हती मात्र देखाव्याच्या माध्यमातूनाही हुबेहूब प्रतीकृती वडील साकारत असत. तेव्हा फार अप्रूप वाटायचे आणि ते पाहून मलाही त्यात गोडी निर्माण झाल्याचे रत्नाकर पाटील सांगतात. चलचित्र देखाव्याच्या माध्यमातून या ठिकाणी आतापर्यंत पाटील यांनी सत्यनारायण कथा, तुकाराम महाराज वैकुंठ गमन, गंगा अवतरण, बजरंगबली आपल्या बाहुवर राम लक्ष्मण यांना खांद्यावर घेऊन जात असतानाचा देखावा, शिवाजीमहाराज राज्याभिषेक सोहळा, शिर्डी समाधी मंदिर यांसारखे देखावे साकारण्यात आले आहेत. यावर्षी साकारलेले दत्तात्रेय अवताराचा देखावा हा एका वेगळ्याच विेशात घेऊन जात असल्याची अनुभूती पाहणार्‍याला येते. अंधुक अश अरुंद गुहेर्‍या मार्गातून प्रवेश केल्यानंतर समोरच नऊ फू ट उंचीच्या भव्य शंकराच्या पिंडित बाप्पा विराजमान झालेले दिसतात. तर त्याच पिंडीवर आपला फणा काढून छत्र धरलेले २० फुट लांबीचे विशाल असे नागराज आणि पिंडीसमोरच डौलदार नंदीही पाह्याला मिळतात. याच बरोबरीने रंगीबेरंगी दिव्यांचा कल्पकतेने केलेला वापर भासआभाचे वातावरण निर्माण करण्यात यशस्वी ठरते, पुढे सरकल्यानंतर १५ फुट उंच व ६ फूट रुंद साकारलेली दीपमाळ ही लक्ष वेधून घेते. यानंतर समोरच असलेली दिव्य अशी नजर असलेली स्वामी समर्थांची मूर्ती पाहत असताना साक्षात स्वामीच समोर आहेत इतका जिवंतपणा त्या मूर्तीत जाणवतो. या मूर्तीच्यावर औदुंबराच्या झाडातून प्रगटलेली सात फुटी त्रिगुणात्मक दत्तांची मूर्ती अक्षरशः डोळ्यांचे पारणे फेडते. स्वामींच्या उजव्या हाताला साईंची मूर्ती तर डाव्या हाताला असलेली गजाननमहाराज यांची मूर्ती पाहत असताना वातवरण भारावून टाकते. उजव्या बाजूला साकारलेल्या ब्रम्हांडात ब्रम्हा आणि विष्णू यांचे दर्शन होते. त्यानंतर पुढे गेल्यावर सात फुट असलेल्या नंदीवर हातात त्रिशूल घेऊन शिवशंकर उभे राहून आशीर्वाद देत असतानाची भव्य अशी मूर्ती लक्ष वेधून घेते. एकंदरीतच रत्नाकर पाटील आणि त्यांचे सहकारी मित्र यांनी महिनाभर या देखाव्यासाठी जी अहोरात्र घेतलेली मेहनत फळास आल्याचे समाधान हा देखावा पाहून अद्भुत, सुंदर, अविस्मरणीय असे भाव भाविकांच्या चेह-यावर पाहत असताना मिळते. या घरगुती पण भव्य असलेल्या गणपतीचे आणखी एक वैशिट्य म्हणजे या बाप्पाच्या आगमनाच्या तसेच विसर्जनाच्या मिरवणुकीत पर्यावरणाला हानी पोहचेल अशा कोणत्याही प्रकारचे साधनांचा वापर केला जात नाही भक्तीमय आणि संस्कृती जपणार्‍या पारंपारिक अशा वातवरणाच बाप्पाची मिरवणूक होते. डीजे, फटाके यांवरचा अनावश्यक खर्च टाळून त्या खर्चातून येणार्‍या भाविकांसाठी भव्य अशा महाप्रसादाचे आयोजन करण्यात येते. यावेळी देखील ४ सप्टेंबर रोजी अशा महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असून जास्तीत जास्त भाविकांनी दत्तात्रेय अवतार ही सजावट पाहण्यासाठी व महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन रत्नाकर पाटील यांनी केले आहे.

टिटवाळा