डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकासाठी शहापूर तहसीलदार कार्यालयावर मोर्चा

वासिंद,दि.१९(वार्ताहर)-भारतीय संविधानाचे शिल्पकार महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासाठी शहापूर न्यायालयालयाच्या बाजूला असलेली दहा गुंठे जागा मिळावी व डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारकासाठी असलेल्या जागेवर सुरू असलेले बांधकाम त्वरित थांबवावे या मागणीसाठी शहापूर तालुक्यातील शेकडो भिमसैनिकांनी नुकताच शहापूर तहसीलदार कार्यलयावर भव्य मोर्चा काढला व आपल्या मागणीकडे प्रशासनाचे लक्ष वेधले. शहापूर येथील न्यायालयाच्या बाजूला असलेल्या कंळभे येथील सर्व्हे नंबर २५ मध्ये ०.१०.० क्षेत्र जागा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकासाठी मिळावी, अशी मागणी गेली २३ वर्षांपासून डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजप्रबोधन मंडळ शासनस्तरावर करीत आहे. बाबासाहेबांच्या स्मारकासाठी १० गुंठे जागा मिळविण्यासाठी सरकारी बाजारभावानुसार समाजप्रबोधन मंडळाच्या वतीने यापूर्वीच अनमात रक्कमही भरणा केला आहे. समाजप्रबोधन मंडळाचा एकीकडे बाबासाहेबांनच्या स्मारकासाठीचा हा लढा सुरू असताना न्यायालयालगतच्या जागेवर कोणीतरी बेकायदेशीर अतिक्रमण करीत असून तेथे सध्या कंपाऊंडसाठी खोदकाम करून बांधकाम सुरू असल्याचा आरोप डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाजप्रबोधन मंडळाने केला आहे. हे बांधकाम त्वरित थांबवावे व डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारकासाठ जागा मोकळी करून द्यावी, अशी मागणी करीत संतप्त भिमसैनिकांनी तहसीलदार कार्यलयावर बुधवारी सकाळी धडक दिली. शहापूरचे तहसीलदार रविंद्र बाविस्कर यांना मोर्चेकरांच्या वतीने यावेळी लेखी निवेदन देण्यात आले. न्यायालयाच्या बाजूला सुरू असलेले ते बांधकाम त्वरित थांबविले जाईल, असे ओशासन यावेळी तहसीलदार बाविस्कर यांनी मोर्चेकरांच्या शिष्टमंडळाला दिले. यावेळी भगवान गायकवाड, बुधाजी वाढविंदे, किरण थोरात, राजेश निकम, पी.बी.भंडागे, संजय भालेराव, बंधू भोईर, मंगल रंथे, शेखर उबाळे, काळुराम संगारे, ज्योती गायकवाड, श्रीपद संगारे, मनोज साळवे हे उपस्थित होते. यावेळी आंबेडकर स्मारकाची मागणी लवकरात लवकर पूर्ण न झाल्यास आणखी तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही यावेळी मोर्चेकरांनी दिला आहे.

वाशिंद