टेंभरे-ठिळेङ्गाटा रस्त्याची दुरवस्था

शेंद्रुण,दि.१८(वार्ताहर)-टेंभरे गावात जाणार्‍या रस्त्याची प्रचंड प्रमाणात दुरवस्था झाल्यामुळे येथील शालेय विद्यार्थी, वयोवृध्द, तसेच वाहनचालकांना या रस्त्यावरून जाताना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. गावातील नागरिकांना शहापूर व मुरबाड येथे जाण्यासाठी या रस्त्यानेच प्रवास करावा लागतो, परंतु रस्त्यावर ठिकठिकाणी पडलेले मोठे खड्डे तसेच उचकटलेली खडी या सर्वांतून वाहन चालवताना वाहनचालकांना जीव मुठीत घेऊन वाहन चालवण्याची वेळ आली आहे. तर पायी चालणार्‍या व्यक्तींनाही या रस्त्यावर उचकटलेल्या खडीतून जाताना पाय घसरून पडण्याची भिती मनात धरून चालावे लागत आहे. या रस्त्याच्या दुरुस्तीकरिता टेंभरे ग्रामस्थानी जि.प.बांधकाम विभागातील संबंधित अधिकार्‍यांना वेळोवेळी कळवूनही आजतागायत या रस्त्याची कोणत्याही प्रकारची डागडुजी केलेली नाही. दरम्यान, येत्या महिन्याभरात टेंभरे-ठिळेङ्गाटा रस्त्याच्या दुरुस्तीचे काम सुरू न झाल्यास लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल, असा सज्जड इशारा ग्रामस्थांनी प्रशासनाला दिला आहे. टेंभरे-ठिळेङ्गाटा रस्त्याने प्रवास करणे आम्हाला जिकरीचे झाले असून संबंधित विभागाने येत्या महिनाभरात रस्त्याची दुरुस्ती न केल्यास लोकशाही मार्गाने वेगळा पर्याय निवडावा लागेल, असे पुंडलिक सातपुते, ग्रामस्थ टेंभरे यांनी सांगितले.

शेंद्रुण