आपसातील वादात हत्या करणारे आरोपी गजाआड

कसारा,दि.२२(वार्ताहर)-येथील रहिवासी निवृत्ती वाघ यास किरकोळ कारणावरून त्याची भावजय, तिची बहीण आणि भाऊ या तिघांनी मिळुन जीवे ठार मारल्याची घटना रविवार रोजी घडली. निवृत्तीची पत्नी अरुणा वाघ हिने कसारा पोलिसांत दिलेल्या फिर्यादीनुसार आरोपींना तात्काळ अटक करण्यात आली असल्याची अधिकृत माहिती पोलीस सूत्रांकडून देण्यात आली आहे. या बाबतची सविस्तर माहिती अशी की, कसारा येथे प्रत्येक रविवारी आठवडी बाजार असतो; या बाजारात फिर्यादी अरुणा निवृत्ती वाघ हिने गृहोपयोगी वस्तूंप्रमाणेच लहानग्यांना नेहमीप्रमाणेच खाऊ देखील खरेदी केला होता. सायंकाळी ६.३० वा. घरी पोहचताच तिने आपल्या मुलांना तर खाऊ दिलाच,शिवाय जाऊबाईच्या मुलांनाही खाऊ देण्याच्या उद्देशाने त्यांना आपल्या घरी आणावयास गेली. मात्र जाऊ जानीबाई हिने स्पष्ट नकार दिला व अर्वाच्य शब्दात तिला शिविगाळ केली. आणि मारदेखील दिला. हे भांडण अरुणाचा नवरा सोडविण्यास गेला असता त्यालाही बेदम मारहाण केली, त्यामुळे तो जागीच निपचित पडला, असे फिर्यादीत नोंदेवीण्यात आले आहे. त्यास उपचारासाठी प्रथम खर्डी व नंतर लगेच शहापूर उपजिल्हा रुग्णालयात नेले असता तेथील डॉक्टरांनी निवृत्ती यास मृत घोषीत केले. पत्नी अरुणाने तक्रार नोंदविताच चोवीस तासांच्या आत जानीबाई वाघ, पिंटी वाघ, शिवाजी काळू रण यांना कसारा पोलिसांनी अटक केली असुन त्यांच्यावर खुनाचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

कसारा