इंग्रजी वर्णमाला, अंक, प्राणी, चित्रे, रंगांचे ज्ञान
ठाणे: शहापूर तालुक्यातील वासिंद येथील अवघ्या एक वर्ष आणि नऊ महिने वयाच्या नमन पाटील याच्या तल्लख बुद्धीची आणि स्मरण शक्तीची चर्चा देशभर होत असून इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्सने त्याला प्रमाणपत्र देवून सन्मानित केले आहे.
१० ऑक्टोबर २०२१ रोजी नमनचा जन्म झाला. विशाल पाटील आणि अरुणा पाटील असे त्याच्या आई-वडिलांचे नाव आहे. पालकांनी सांगितल्याप्रमाणे नमनने वयाच्या आठव्या महिन्यापासूनच आपली प्रतिभा विकसित करण्यास सुरुवात केली होती. जसजसे दिवस सरत होते, तसतसे तो त्याच्या सभोवतालच्या जवळजवळ सर्व गोष्टी ओळखू लागला आणि तो स्पष्टपणे त्यांना लक्षात ठेवून ते आठवू लागला.
इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्सने २५ जुलै, २०२३ रोजी पुष्टी केल्यानुसार नमनला इंग्रजी वर्णमाला, १ ते १० पर्यंतच्या संख्या, १२ प्राणी, तीन पक्षी, १० रंग, १० आकार, १० वाहने आणि १४ विविध चित्रांचे त्याला ज्ञान आहे.
त्याची बुद्धिमत्ता देवाची देणगी आहे. इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्सने केलेली नोंद म्हणजे त्याच्या तल्लखपणा आणि प्रयत्नांचा सन्मान आहे. त्याला आपल्या देशाकडून मिळालेल्या कौतुकाबद्दल आम्हाला खूप अभिमान आणि आनंद वाटतो, यामुळे त्याचा आत्मविश्वास वाढेल आणि या कौतुकाचा त्याच्या येणाऱ्या यशस्वी आयुष्याला नक्कीच हातभार लागेल. आपल्या देशालाही त्याच्या यशाचा अभिमान वाटेल, अशी प्रतिक्रिया नमनच्या पालकांनी दिली.