नागपूर : हिवाळी अधिवेशनाच्या समारोपानंतर राज्यातील सहा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत. नवी मुंबई सिडकोला नवे व्यवस्थापकीय संचालक मिळाले आहेत. तर पुणे आणि नाशिकला नवे आयुक्त मिळाले आहेत. त्याशिवाय नागपूरलाही नवे आयुक्त मिळाले आहेत.
सहा महिन्यापूर्वी झालेल्या सत्तातंरानंतर अधिकाऱ्यांच्या बदल्यांना वेग आला आहे. काही दिवसांपूर्वी 25 पेक्षा जास्त बदल्या करण्यात आल्या होत्या. त्यानंतर आता पुन्हा सहा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये राजेश पाटील, दीपक सिंगला आणि भाग्यश्री बानायत या अधिकाऱ्यांचाही समावेश आहे. महाराष्ट्र राज्य सैनिक कल्याण कार्यालय, पुणे येथून राजेश पाटील यांची बदली झाली आहे. ते नवी मुंबई सिडको येथे सह व्यवस्थापकीय संचालक म्हणून लवकरच पदभार स्विकारणार आहेत. अश्विन मुदगल नवी मुंबई सिडकोच्या सह व्यवस्थापकीय संचालक पदावरुन बदली झाली आहे. ते मुंबईमध्ये एमएमआरडीएमध्ये अतिरिक्त आयुक्त म्हणून कार्यभार सांभाळणार आहेत.अजय गुल्हाने यांच्यावर नागपूर स्मार्ट सिटीच्या सीईओपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. त्याशिवाय नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त म्हणून त्यांच्याकडे अतिरिक्त पदभार सोपवण्यात आला आहे.
दीपक सिंगला यांची अतिरिक्त आयुक्त, पीएमआरडीए पुणे म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. भाग्यश्री बानायत यांची नाशिक महानगरपालिका, नाशिक येथे अतिरिक्त महापालिका आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. डॉ. इंदुरानी जाखर ‘माविम’च्या व्यवस्थापकीय संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
दरम्यान, डिसेंबर 2022 च्या दुसऱ्या आठवड्यात राज्य सरकारने 30 वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या होत्या. त्याशिवाय काही अधिकाऱ्यांची पदोन्नतीही करण्यात आली होती. यामध्ये पुण्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, मीरा भाईंदर वसई विरारचे पोलीस आयुक्त सदानंद दाते, मुंबईचे सह पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांचाही समावेश होता. आता हिवाळी अधिवेशन संपल्यानंतर सहा पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. काही आयएएस अधिकाऱ्यांकडे अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे.