भाईंदर: मीरा-भाईंदर आणि वसई-विरार पोलीस आयुक्तालयात गेल्या अनेक वर्षांपासून ठाण मांडलेल्या काही पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची सुभेदारी पोलीस आयुक्त मधुकर पांडे यांनी मोडीत काढली आहे. अनेक वर्षांपासून एकाच ठिकाणी काम करणाऱ्या १९९ अधिकाऱ्यांच्या विविध ठिकाणी बदल्या करण्यात आल्याने सुभेदार बनलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ माजली आहे.
मीरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालय स्तरावरील पोलीस आस्थापना मंडळाने पोलीस निरीक्षक, उपनिरीक्षक यांच्या अंतर्गत आणि बाहेरील जिल्ह्यातून आलेल्या पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. आयुक्तालयात प्रत्येक पोलीस ठाण्यात ज्यांचा कार्यकाळ पूर्ण झाला आहे अशा पोलीस निरीक्षक, सहाय्यक पोलीस निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक यांच्या अंतर्गत बदल्या केल्या आहेत. बदली झालेल्या पोलीस अधिकाऱ्यांमध्ये २७ पोलीस निरीक्षक, ६० सहाय्यक पोलीस निरीक्षक व ११२ पोलीस उपनिरीक्षक यांचा समावेश आहे. येत्या पाच दिवसांत वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या बदल्यासुद्धा करण्यात येणार असल्याची शक्यता आहे. राज्य शासनाची मंजुरी घेऊन ९८६ पोलीस शिपाई आणि १० पोलीस वाहनचालक पदांची भरती करण्यात आली असून ते सध्या पोलीस प्रशिक्षण घेत असून ते येत्या पुढील वर्षी आयुक्तालयात येणार आहेत.