एटीएममध्ये बोलण्यात गुंतवून कार्ड बदलणारे तीन गुन्हेगार अटकेत

ठाणे : एटीएममध्ये बोलण्यात गुंतवून हातचलाखीने कार्ड बदलून फसवणूक करणा-या तीन सराईत गुन्हेगारांना गुन्ह्यात वापरलेल्या वाहनांसह साडेचार लाख रुपयांच्या मुद्देमालासह अटक करण्याची कामगिरी ठाणे शहर गुन्हे शाखा घटक दोन भिवंडीच्या पोलिसांनी गुरुवारी केली.

हे गुन्हेगार पोलीस रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असून त्यांच्याविरुद्ध सात गुन्हे दाखल आहेत. या आरोपींना निजामपुरा पोलीस ठाण्यात डांबले आहे. या गुन्ह्यांच्या तपासकामी निजामपुरा पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.

निजामपुरा ठाण्याचे पोलीस एका गुन्ह्याचा शोध गुन्हे शाखा घटक दोनचे भिवंडीचे अधिकारी व अंमलदार हे समांतर करत असताना, सीसीटीव्ही फुटेजवरुन तसेच मिळालेल्या माहितीआधारे तीन संशयित आरोपी उल्हासनगर आणि अंबरनाथ येथून ताब्यात घेतले. त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांची कसून चौकशी केली असता त्यांनी, एटीएममध्ये आलेल्यांना बोलण्यात गुंतवून कार्ड बदलण्याचे गुन्हे केले असल्याची कबूली दिली.

एटीएममध्ये रक्कम काढण्याकरीता आलेल्यांना बोलण्यात गुंतवून हातचलाखीने एटीएम बदलून तसेच पैसे काढण्यासाठी गेलेल्यांच्या कार्डांचे पीन नंबर पाहून वेगवेगळया ठिकाणी गुन्हे केल्याची कबूली दिली. त्यांनी सांगितलेल्या ठिकाणांबाबत अभिलेख पाहिला असता त्यांनी निजामपुरा, मुंब्रा, भिवंडी, कोळसेवाडी, मध्यवर्ती, बदलापूर, कल्याण तालुका या पोलीस ठाण्यांच्या हद्दीत हे गुन्हे केले असल्याची कबूली दिली.

ठाणे पोलीस आयुक्तालयातील विविध पोलीस ठाणे, मुंबई, नवी मुंबई,  ठाणे ग्रामीण, मिरा- भाईंदर, पालघर व नाशिक आदी ठिकाणी गुन्हे केले असल्याची कबुली दिली. त्यांच्याकडून गुन्हे करताना वापरलेली वाहने, वेगवेगळ्या बँकांची एटीएम  कार्डस् असा एकूण साडेचार लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. ही कामगिरी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा घटक दोन भिवंडीचे सहाय्यक निरीक्षक विजय मोरे, सहाय्यक निरीक्षक धनराज केदार, उपनिरीक्षक रमेश शिंगे, सहाय्यक उपनिरीक्षक रामचंद्र जाधव, सर्वश्री हवालदार सुनिल साळुंखे, शशिकांत यादव, राजेश शिंदे, साबीर शेख, रंगनाथ पाटील, मंगेश शिर्के, जगदिश कुलकर्णी, देवानंद पाटील, पोलीस नाईक सचिन जाधव, कॉन्स्टेबल भावेश घरत, सर्वश्री शिपाई रोशन जाधव, प्रशांत बर्वे, चालक पोलीस शिपाई साळुंखे, महिला पोलीस नाईक खताळ आणि डोंगरे यांनी बजावली.