ठाण्यातील राष्ट्रवादीचे दोन मोठे मासे शिंदे गटाच्या गळाला

थेट पक्षप्रवेश की विकास आघाडी यावर झाली खलबते
ठाणे: ठाणे शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन दिग्गज नेत्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गळाला लावून राष्ट्रवादीला ‘जोर का झटका धीर से’ देण्याची रणनीती आखली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची काल रात्री राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन वजनदार नेत्यांनी उपवन येथील महापौर निवासस्थानी जाऊन भेट घेतली. त्यांची बाळासाहेबांची शिवसेना या पक्षात प्रवेश करण्याबाबत प्राथमिक बोलणी झाली आहे. या दोन्ही नेत्यांचा थेट प्रवेश करून घ्यायचा की ठाणे विकास आघाडी करून निवडणूक रिंगणात उतरवायचे याबाबत बोलणी झाली असली तरी एक पदाधिकारी थेट बाळासाहेबांच्या शिवसेनेत प्रवेश घेणार असल्याचे खास सूत्राने सांगितले आहे.
या भेटीबाबत त्या नेत्यांशी संपर्क साधला असता ते म्हणाले की आम्ही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांची भेट घेतली आहे तसेच आ. जितेंद्र आव्हाड यांची देखील आज भेट घेतली आहे. त्यांनी भेटीचा तपशील देण्यास मात्र नकार दिला तर दुसऱ्या नेत्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, परंतु तो होऊ शकला नाही.
मुंब्रा येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही नगरसेवकांनी बंडाचे निशाण हाती घेतले आहे. मुंब्रा विकास आघाडी करून आ. आव्हाड यांना शह देण्याची व्यूहरचना आखली असतानाच ठाण्यात देखील आ. आव्हाड यांना कात्रीत पकडण्यासाठी मुख्यमंत्री श्री. शिंदे स्वतः रिंगणात उतरले आहेत, त्यामुळे महापालिकेची निवडणूक जाहीर होईपर्यंत ठाण्यात मोठ्या प्रमाणावर उलथापालथ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
कळवा-मुंब्रा मतदार संघासह उर्वरित ठाण्यात विकास कामांच्या श्रेयावरून खासदार श्रीकांत शिंदे आणि राष्ट्रवादीचे नेते माजी मंत्री डॉ.जितेंद्र आव्हाड यांच्यात जोरदार संघर्ष मागील काळात पाहायला मिळाला. दोन्हीकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या. या पार्श्वभूमीवर आव्हाड यांना अडचणीत आणण्यात कोणतीही कसर विरोधकांनी सोडलेली नाही. राष्ट्रवादीतील मोठे मासे गळाला लाऊन आव्हाड यांचे राष्ट्रवादीतील स्थान डळमळीत करण्याचा हा डावही अपयशी ठरणार नाही याची पुरेपूर काळजी राष्ट्रवादीतील अंतर्गत विरोधक आणि विरोधी पक्ष घेतील यात दुमत नाही