कोंदट जागेतून न्यास नोंदणी कार्यालय हलणार भव्य इमारतीत

आमदार संजय केळकर यांच्याकडून पाठपुरावा

गेली ३२ वर्षे ठाणे-पालघरमधील हजारो संस्थांची नोंदणी करणारे आणि त्यांची वर्षानुवर्षे बाडे सांभाळणारे सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय अखेर छोट्या आणि कोंदट जागेतून भव्य इमारतीत हलणार आहे. आमदार संजय केळकर यांनी याबाबत पाठपुरावा केला होता. नवीन जागेत आवश्यक फर्निचरसाठी निधीही मंजूर करून घेण्यात त्यांना यश आले आहे.

ठाणे -पालघर जिल्ह्यात हजारो नोंदणीकृत सार्वजनिक संस्था, मंडळे आणि ट्रस्ट असून गेल्या ३० वर्षांहून अधिक काळ या संस्थांची नोंदणी टेम्भी नाका येथील सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयात होत आहे. या कार्यालयात रोज शेकडो संस्था पदाधिकाऱ्यांची ये-जा होत असते तर येथील कर्मचाऱ्यांनाही अथकपणे त्यांना सेवा द्यावी लागत आहे.

दोन-तीन मजल्यांमध्ये हे कार्यालय विभागलेली जागा अत्यंत अपुरी आणि कोंदट असल्याने कर्मचाऱ्यांच्या आरोग्याचा प्रश्न भेडसावत असून त्यांच्या कार्यक्षमतेवरही परिणाम होत आहे. दुसरीकडे येथे येणाऱ्या नागरिकांनाही सुविधांअभावी समस्यांना तोंड द्यावे लागत होते. एकूणच मागील पिढीने अनुभवलेल्या समस्या नवीन पिढीही अनुभवत आहे. त्यांच्या तक्रारी आणि अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या मागणीचा विचार करून आमदार संजय केळकर यांनी हा प्रश्न धसास लावला. गेली चार वर्षे त्यांनी सातत्याने केलेल्या पाठ पुराव्याला यश आले आहे.

उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विधी-न्याय विभागाच्या प्रधान सचिवांकडे पत्रव्यवहार-चर्चा करून श्री राम मारुती मार्ग येथील वारकरी भवन असलेल्या भव्य इमारतीत न्यास नोंदणी कार्यालयाला भाडेपट्ट्याने जागा मिळवून दिली. तब्बल ६०९० चौरस फूट चटई क्षेत्र असलेली ही जागा सर्व सुविधांनी युक्त असून हवेशीर आणि मोकळी आहे. श्री.केळकर हे एवढ्यावरच थांबले नसून त्यांनी या नवीन जागेत आवश्यक फर्निचर आणि साहित्यासाठी २६ लाख ५० हजार रुपयांचा निधीही मंजूर करवून घेतला आहे. लवकरच जुने कार्यालय या नवीन जागेत स्थलांतरीत होणार असल्याने कर्मचाऱ्यांसह हजारो संस्था-मंडळाच्या लाखो पदाधिकारी -कार्यकर्त्यांनी त्यांचे आभार मानले आहेत.

गेल्या दोन-तीन पिढ्या संस्था नोंदणीसाठी आणि विविध परवानग्यांसाठी न्यास नोंदणी कार्यालयात ये-जा करीत होत्या. कोंदट आणि असुविधा असलेल्या या कार्यालयात कर्मचारी आणि कार्यकर्त्यांना अनेक समस्या भेडसावत होत्या. आमदार संजय केळकर यांनी नवीन आणि भव्य कार्यालय मिळवून दिल्याने ते लाखो सामाजिक कार्यकर्त्यांच्या मागील आणि नवीन पिढ्यांच्या कायमच स्मरणात राहतील, अशा कृतज्ञतेच्या भावना नागरिक व्यक्त करीत आहेत.