पालकांची कारवाईची मागणी
ठाणे : पाचपाखाडीतील प्रतिष्ठित शिशुवर्गाच्या शाळेतील शिक्षिकेने तीन वर्षांच्या चिमुरड्याला ओढणीने बांधल्याचा प्रकार सीसीटीव्हीतही कैद झाल्याचा दावा चिमुरड्याच्या वडिलांनी केला आहे. शिक्षिकेने पुन्हा बांधण्याची धमकी दिल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.
संबंधित शिक्षिकेवर कारवाईची मागणी त्यांनी एका पत्राद्वारे केली असून याबाबत नौपाडा पोलिस ठाण्यात तक्रारही दिली आहे. वडिलांनी हे पत्र शनिवारी सोशल मीडियावरही व्हायरल केले. या पत्रात त्यांनी आपल्या मुलावर गुदरलेल्या प्रसंगाची माहिती दिली. पाचपाखाडीतील या प्ले स्कूलमध्ये १६ जून रोजी दुपारी २ वाजता मुलाची आई त्याला घेण्यासाठी शाळेत गेली. तेव्हा त्याच्या वागण्यात बदल झालेला दिसला. शिक्षिकेने त्याला बांधून ठेवल्याचे सांगितले. त्या शिक्षिका ओरडतात. त्यामुळे शाळेतच जायचे नाही, असा पवित्रा मुलाने घेतल्याने पालकांना धक्का बसला.
वडिलांनी शाळेच्या प्रमुखांशी संपर्क केला असता, त्यांनी मुलाला बांधले नव्हते तर केवळ हात पकडून ठेवले होते, असा दावा केला. वडिलांनी सीसीटीव्ही चित्रण पाहिले, तेव्हा शिक्षिकेने मुलाला हाताने फटका मारल्याचे तसेच दोनदा ओढणीने बांधल्याचे दिसले. यासंदर्भात शाळेच्या प्रभारीशी संपर्क साधला असता, त्यांनी यावर भाष्य करण्यास नकार दिला. या शिक्षिकेवर कारवाईचे आश्वासन प्रभारींनी दिल्याचेही वडिलांनी सांगितले.