आमदार प्रताप सरनाईक यांची मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्याकडे मागणी
ठाणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटातील आमदार प्रताप सरनाईक यांनी तीन सदस्यीय प्रभाग पद्धतीला विरोध करत चार सदस्यीय प्रभाग करण्याची मागणी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याकडे केली आहे. तसे झाल्यास ठाण्याबरोबरच राज्यातील अन्य महापालिकांमध्ये शिंदे गटाला फायदा होण्याची शक्यता आहे.
शिवसेना-भाजपा युतीच्या कार्यकाळामध्ये महाराष्ट्रातील सर्व महानगरपालिकांमध्ये चार नगरसेवकांचा एक प्रभाग केला होता आणि त्यानुसार निवडणुकांही झाल्या होत्या. त्यामुळे बहुतांश महानगरपालिका क्षेत्रातील सर्व जाती-धर्माच्या पुरूष व महिला कार्यकर्त्यांना प्रभागातील आरक्षणानुसार निवडणुक लढण्याची संधी प्राप्त होऊन ते नगरसेवक म्हणून निवडुनही आले होते असा दावा सरनाईक यांच्याकडून करण्यात आला आहे. महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षाने आपल्या सोयीनुसार तीन नगरसेवकांची प्रभाग रचना केली. नुकत्याच झालेल्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार ओ.बी.सी. आरक्षणासहित पुढील निवडणुका घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. या आदेशामध्ये बांठिया आयोगाने सुचविलेल्या ओ.बी.सी.च्या जनगणनेनुसार सर्व महापालिकांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे आरक्षण पडलेले आहे. त्यामुळे निवडणुक आयोगाला परत एकदा ओ.बी.सी. आरक्षणासहित प्रभाग रचना करणे बंधनकारक असल्याचे सरनाईक यांचे म्हणणे आहे.
युती सरकारच्या कार्यकाळात असलेल्या चार सदस्यांच्या प्रभाग रचनेनुसार पुढील निवडणुका घेतल्यास त्याचा फायदा समाजातील सर्व घटकांना होऊन जनतेची कामे करण्यास सुलभ होईल. त्यामुळे येणाऱ्या मंत्रीमंडळाच्या बैठकीमध्ये राज्यातील सर्व महानगरपालिकांमध्ये चार सदस्यांच्या प्रभाग रचना करण्याचा असलेला विषय मंजूर करून येत्या अधिवेशनामध्ये त्याची अंतीम मंजूरी घ्यावी, अशी प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.