नवी मुंबई : मागील वर्षी घाऊक बाजारात शंभरी पार केलेल्या टोमॅटोचे दर चार ते पाच महिने १२ ते१५ रुपयांवर स्थिरावले असताना बाजारात आता पुन्हा एकदा टोमॅटोच्या दराने उसळी घेण्यास सुरुवात केली आहे.
वाशीतील एपीएमसी घाऊक बाजारामध्ये आधी २०-२४ रुपयांनी उपलब्ध असलेले टोमॅटो आता २८-३२ रुपयांवर गेले असून दरात आठ रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे यंदा देखील टोमॅटोचा दर गगनाला भिडणार का? याची चिंता गृहिणींना सतावत आहे.
वाशीतील एपीएमसी भाजी बाजारात टोमॅटो कमी प्रमाणात दाखल होत आहे. परिणामी आवक कमी आणि मागणी जास्त यामुळे दरवाढ झालेली आहे. मागील आठवड्यात दोन हजार क्विंटलहून अधिक टोमॅटो दाखल होत होते, ते आता १८०० क्विंटल दाखल होत आहेत. पावसामुळे उत्पादन खराब होत असून शेतातून उत्पादन घेण्यास अडचणी येत आहेत, त्यामुळे बाजारात आवक कमी झाली आहे.
वाशीतील बाजारात राज्यातील सातारा, सांगली आणि संगमनेर तर बंगळूरमधून टोमॅटो दाखल होतात. मागील वर्षी जुलैमध्ये टोमॅटोच्या दराने उच्चांक गाठला होता. किरकोळ बाजारात १५० ते १८० रुपयांवर तर घाऊक बाजारात १०० ते ११० रुपयांपर्यंत पोहोचले होते. मात्र ऑगस्टनंतर टोमॅटोचे दर उतरले होते ते आतापर्यंत टोमॅटोचे दर आवाक्यात होते. मात्र आता पुन्हा टोमॅटोच्या दाराने उसळी घेतली असून घाऊक बाजारात प्रतिकिलो २८ ते ३२रुपये तर किरकोळ बाजारात ४० ते ६० रुपयांनी विक्री होत आहे. बाजारातील आवक अशीच घटत राहिली तर यंदा देखील टोमॅटोच्या दरात वाढ होण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी वर्तवली आहे.