रंगायतन परिसरात पाच हजार चौ.मिटर जागेवर कब्जा?
ठाणे: शहरात पार्किंगची समस्या मोठ्या प्रमाणावर भेडसावत असताना मोक्याच्या ठिकाणी असलेला ठाणे महापालिकेचा भूखंड महाराष्ट्र जीवन प्राधिकरण मागील सहा वर्षांपासून सोडण्यास तयार नाही, त्यामुळे पार्किंग प्लाझा रखडण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने ठामपाला पाणीपुरवठा सुरु केला होता, त्यावेळी प्राधिकरणाचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना निवास स्थानाकरिता तलावपाळी येथील महापालिकेच्या मालकीचा पाच हजार चौरस मिटरचा भूखंड देण्यात आला होता. त्यावर सद्या प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांचे बंगले आणि कार्यालय आहे.
या भूखंडावर पार्किंगची सोय करण्यासाठी तसेच ठाणेकरांना तलावपाळी येथे डेक बनवून त्यावरून तलावाचे सौंदर्य टिपता यावे यासाठी मागील सहा वर्षापासून महापालिका त्या भूखंडाची मागणी करत आहे, परंतु राज्य सरकारच्या पाणी पुरवठा विभागाचे अधिकारी त्याकडे दुर्लक्ष करत आहेत.
या भूखंडावर महापालिका सुमारे तीनशे ते चारशे चार चाकी गाड्या पार्किंग करण्याची सोय करणार आहे, त्यामुळे तलावपाळी परिसरात फिरण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना पार्किंगची सोय नसल्याने ते गाड्या तलावाच्या परिसरात उभ्या करतात. परिणामी संध्याकाळी या भागात मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत असते. ठाणेकर महापालिकेच्या नावाने दूषणे देत असतात. राज्य सरकारने लवकरात लवकर महापालिकेला तो भूखंड दिला तर पार्किंगची समस्या दूर होईल, असे महापालिकेतील एका अधिकाऱ्याने ‘ठाणेवैभव’ला सांगितले.