लाडक्या ‘शेरू’च्या मृत्यूने सोसायटीचे सदस्य हळहळले

Thanevaibhav Online

17 October 2023

* श्वानाची हत्या झाल्याचा आरोप
* पोलिसांनी घेतली नाही तक्रार

ठाणे : जन्मापासून ते मोठा होईपर्यंत अगदी कुटुंबाचा सदस्य असल्यासारखा त्याला वाढवला. मात्र एक दिवस अचानक तो सोसायटीच्या आवारातून तो दिसेनासा झाला. सोसायटीतील सदस्यांकडून त्याची शोधाशोध सुरु झाली आणि त्याचा मृतदेह मुंबईतील आरे कॉलनीजवळ सापडला. सोसायटीमधील नागरिकांना हा मोठा धक्का होता. एखाद्या चित्रपटाला शोभावी अशी सत्य घटना आहे ठाण्यातील शेरू या श्वानाची.

या श्वानाचे अपहरण करून तसेच नियोजित कट रचून त्याची निर्घृण हत्या करण्यात आल्याचा आरोप सोसायटीमधील नागरिकांनी केला आहे. या हत्येमागे एक प्राण्यांचाच डॉक्टर असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. ठाणे आणि मुंबई पोलिसांना सीसीसीटीव्ही तसेच अनेक पुरावे सादर करूनही शेरूच्या खुन्याच्या विरोधात तक्रार का दाखल करून घेतली जात नाही असा प्रश्न इथल्या नागरिकांकडून उपस्थित करण्यात आला आहे. जोपर्यंत मृत शेरूला न्याय मिळत नाही तोपर्यंत लढा सुरूच ठेवण्याचा निर्धार इथल्या नागरिकांनी केला आहे.

ठाण्यातील हिरानंदानी इस्टेट येथील प्लॅटिनम हेरिटेज या इमारतीमध्ये ही घटना घडली आहे. सोसायटीच्या आवारातून शेरू नावाच्या एका मुक्या कुत्र्याला पळवून नेऊन त्याची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. 21 ऑगस्ट रोजी हा प्रकार उघड झाला आहे. जेव्हा नेहमीप्रमाणे शेरुला जेवण देण्यासाठी गेल्यानंतर शेरू जागेवर नव्हता. शेरू नेहमीच्या जागेवर नसल्याने त्याची शोधाशोध सुरु झाली. अखेर सीसीटीव्हीच्या माध्यमातून शेरूच्या अपहरणाचा उलगडा झाला, अशी माहिती सोसायटीमधील रहिवासी वैभवी चित्रे यांनी दिली.

शेरूला इमारतीमध्ये राहणाऱ्या एका प्राण्याच्या डॉक्टरने एका टेम्पोतून नेल्याचे सीसीटीव्हीमध्ये दिसत आहे. या डॉक्टरला विचारणा केली असता त्यांनी मुंबईतील आरे कॉलनी येथे सोडून दिल्याची कबुली दिली. मात्र त्या ठिकाणी गेल्यानंतर शेरू नव्हे तर त्याचा मृतदेह सापडला.

अल्फा फाउंडेशनच्या प्राणीमित्र सोनाली वाघमारे यांनी तत्काळ पोलिसांशी संपर्क साधला असता त्यांनी गुन्हा नोंदवून घेण्यास टाळाटाळ केली. याविषयी सर्व प्राणीमित्र संघटनानी संताप व्यक्त केला आहे. पोलिसांना सर्व पुरावे सादर करण्यात आले असून जोपर्यंत या प्रकरणावर कायदेशीर कारवाई होणार नाही तोपर्यंत या सर्व प्रकरणाचा पाठपुरावा करणार असल्याचे वाघमारे यांनी स्पष्ट केले.

शेरुला रोज जेवण देणे, येताना-जाताना त्याच्याशी खेळणे हा सोसाटीमधील सर्वच नागरिकांचा नित्याचा दिनक्रम. रोज नजरेसमोर असणारा शेरू आज अचानक नजरेआड झाला आहे. आमचा शेरू आम्हाला आता कधीच भेटणार नाही मात्र त्याच्या खुन्याला शिक्षा दिल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही, असा निर्धार या नागरिकांनी केला आहे.