‘आपली जबाबदारी’ डिजिटल प्रार्थना
ठाणे : एस.टी परिवहनच्या खोपट आगारातून बस बाहेर काढण्यापूर्वी चालक, वाहक आणि कर्मचारी यांच्याकडून एकही अपघात न होण्याकरीता आणि प्रवाशांच्या जबाबदारीची सुरक्षितता अबाधित राखावी, अशी प्रार्थना करणार आहेत. ठाणे प्रादेशिक परिवहन विभागाने (आरटीओ) महाराष्ट्रातील हा पहिलाच अनोखा उपक्रम सुरु केला आहे.
खोपट येथील एसटी बस आगारात हा ‘डिजिटल’ प्रार्थना फलक बसवला आहे. बसचे ‘ड्राईव्ह व्हिल’ ताब्यात घेतल्यावर आणि बस सुरु करण्यापूर्वी प्रत्येक वाहक आणि चालकाने हा फलक बसविलेल्या खोलीत जाऊन मनोमन प्रार्थना करावी आणि तद्नंतर त्यांनी बस आगारातून बाहेर काढायची आहे.
ठाणे प्रादेशिक परिवहन विभाग, ठाणे पोलीस वाहतूक शाखा आणि ठाणे एसटी विभाग यांच्यामार्फत रस्ते सुरक्षा अभियान कार्यक्रम आखला होता. यावेळी एस.टी कर्मचा-यांकरीता मार्गदर्शन शिबीर आयोजित केले होते. ठाणे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी जयंत पाटील, एसटी विभाग नियंत्रक विलास राठोड, सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय शेळके, प्रसाद नलावडे, गणेश पाटील, शहर वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पवार आदी उपस्थित होते.
बस चालवताना चालक आणि वाहक यांच्यावर मोठी जबाबदारी असते. त्यांच्याकडून छोटीशी चूक झाल्यास मोठा अपघात होऊ शकतो. त्यामुळे चालकाकडे मोबाईल असल्यास तो बंद ठेवणे महत्वाचे ठरेल. चालकाची नजर इकडे-तिकडे झाल्यास मोठा अनर्थ उद्भवू शकतो, याकडे याबाबत अधोरेखित करण्यात आले. वाहतूक नियमांचे पालन करणे गरजेचेच आहे. पिवळा सिग्नल दिसला की बस थांबवणे आवश्यक आहेच, असे आवाहन या मार्गदर्शनपर शिबीरात करण्यात आले.
माझ्या वाहनात बसून प्रवास करणा-या सोबत्यांचे जीवन माझ्या हातात आहे. माझ्या सर्व सोबत्यांनी माझ्यावर जो विश्वास दाखवला आहे. त्या विश्वासाची जाण ठेवून पात्र राहण्याची मला मदत कर. जेणेकरून मी अतिशय कौशल्याने सुरक्षितरित्या वाहन चालवून त्यांना त्यांच्या इच्छित स्थळी पोहोचवेन, असा आशय डिजिटल फलकावर रेखाटला आहे.