चंद्रयान-३ मोहिमेत ठाणेकराचा सहभाग

निखिल बल्लाळ/ठाणे

ज्या चंद्रयान-३ मोहिमेमुळे अवघ्या जगात भारताचा बोलबाला झाला आहे आणि देशात जल्लोषाचे वातावरण पसरले आहे, त्या मोहिमेत एका ठाणेकर उद्योजकाचाही सहभाग होता.

वागळे इस्टेट येथील एचडी फायर प्रोटेक्ट कंपनीचे संचालक मिहिर घोटीकर यांनी उत्पादित केलेल्या नोझल्सचा वापर उड्डाणाच्या वेळी झाला होता.

‘ठाणेवैभव’शी बोलताना श्री.घोटीकर म्हणाले, ‘भारतीय म्हणून तर मला प्रचंड आनंद झाला आहेच, परंतु आम्ही बनवलेल्या नोझल्सचा वापर झाल्यामुळे या यानातील इलेक्ट्रॉनिक उपकरणांना संरक्षण लाभले. ही यंत्रणा सुरक्षित राहिल्यामुळेच यानावर संपूर्ण नियंत्रण पृथ्वीवरून इस्त्रोचे तंत्रज्ञ करू शकले.’

रॉकेट जेव्हा आकाशात झेपावते, तेव्हा आगीचे प्रचंड लोळ आणि त्याहीपेक्षा प्रचंड आवाज होत असतो. या आवाजाची तीव्रता कमी करण्यासाठी पाण्याची प्रचंड वेगात फवारणी करावी लागते. मिनिटाला तीन हजार प्रती लिटर गतीने ८८ नोझल्समधून फवारणी झाल्यामुळे ध्वनीची तीव्रता १४५ डेसिबल्सखाली आली. मिनिटाला दोन लक्ष ६० हजार लिटर पाणी फवारले गेले. यामुळे तापमान आणि आवाज यांच्या उपद्रवावर नियंत्रण मिळवता येते, असे श्री. घोटीकर यांनी सांगितले.

या नोझल्सच्या निर्मितीसाठी वापरला गेलेला धातू आणि त्याबाबतचे संशोधन श्री. घोटीकर यांच्या प्रयोगशाळेत झाले होते. इस्रोचे तंत्रज्ञ घोटीकर यांच्या जळगाव येथील कारखान्यात प्रात्यक्षिक पाहण्यासाठी आले होते. त्यांनी खातरजमा केल्यावर हे नोझल्स बसवण्यात आले. सप्टेंबर ४ रोजी सुर्याजवळ जे यान सोडण्यात येणार आहे, त्यावेळी हे नोझल्स कार्यरत असतील.