ठाण्यातील रुग्णांच्या मृत्यूनंतर हालचाली
मुंबई: आरोग्य विभागाची नोकर भरती अंतिम टप्प्यात असून पुढील आठवड्यात जवळपास 12 हजार जागांसाठी जाहिरात निघणार आहे. ठाण्यातील रुग्णांच्या मृत्यूनंतर आरोग्य सेवक भरतीला वेग आला असून पुढील आठवड्यात 11,903 जागांसाठी भरतीची जाहिरात निघणार आहे. आरोग्य विभागातील क आणि ड वर्गाच्या पदांसाठी ही जाहिरात असेल.
अनेक दिवसांपासून ही भरती प्रक्रिया रखडली होती, आता ठाण्यात घडलेल्या दुर्दैवी घटनेनंतर या प्रक्रियेला वेग आल्याचे दिसून आले. महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत असताना या भरती प्रक्रियेवर अनेक प्रश्नचिन्ह उभे करण्यात आले होते.
‘क’ आणि ‘ड’ श्रेणीतील 11,903 जागांसाठी पुढील आठवड्यात ही जाहिरात निघण्याची शक्यता आहे. आरोग्य सेवकांच्या क आणि ड वर्गासाठी होणारी ही भरती एमपीएससी, राज्य निवड मंडळ आणि टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस यांच्यामार्फत केली जाणार आहे.
गट क’ संवर्गात परिचारिका, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, आरोग्यसेवक, आस्थापनेवरील पदे यामध्ये लिपिक, टंकलेखक, वाहनचालक यासारख्या पदांचा समावेश आहे. तर ‘गट ड’ संवर्गात शिपाई, सफाई कामगार, कक्षसेवक यासारख्या पदांचा समावेश आहे.
सार्वजनिक आरोग्य विभागातील वरिष्ठ पदे रिक्त असल्याने त्याचा भार कनिष्ठ अधिकाऱ्यांवर पडत आहे. या कार्यपद्धतीवर अधिकाऱ्यांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण आहे. त्यामुळे ही रखडलेली नोकर भरती पूर्ण करण्यासाठी वेग आलेला पाहायला मिळत आहे.